पुणे : शहर आणि परिसरासाठी यंदाच्या थंडीच्या हंगामातील डिसेंबर महिना वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांनी, तसेच दक्षिणेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांनी थंडीचा जोर कमी-जास्त होत राहिला. त्यामुळे गेल्या तीन वर्षांच्या डिसेंबरच्या तुलनेत यंदा सरासरी किमान तापमान अधिक नोंदवले गेले आहे.
गुलाबी थंडीने सुरू झालेल्या डिसेंबरमध्ये मिश्र हवामानाचा अनुभव पुणेकरांनी घेतला. फेंगल चक्रीवादळामुळे दक्षिणेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांनी काही दिवस थंडीचा जोर कमी केला. त्यानंतर चक्रीवादळाचा प्रभाव ओसरल्यानंतर उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे थंडी पुन्हा वाढू लागली. शहरातील तापमान सहा ते आठ अंश सेल्सिअसपर्यंत कमी झाले होते. याच काळात यंदाच्या हंगामातील आतापर्यंतच्या किमान तापमानाचा नीचांकही नोंदवला गेला. त्यानंतर पुन्हा काही दिवस तापमानात वाढ होऊन थंडी कमी झाल्याने उकाडाही अनुभवावा लागला. तसेच काही भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊसही पडला. हवामान विभागाच्या नोंदींनुसार गेल्या दहा वर्षांतील डिसेंबरच्या सरासरी किमान तापमानाचा आढावा घेतला असता, २०१३मध्ये सर्वांत कमी ११.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले होते. तर २०१९मध्ये सर्वाधिक १६.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. या पार्श्वभूमीवर, यंदाच्या डिसेंबरमध्ये सरासरी १४.९ अंश सेल्सिअस तापमान राहिले.
हे ही वाचा… विजयस्तंभ अभिवादन सोहळा उत्साहात, प्रशासनाचे उत्तम नियोजन आणि अनुयायांकडून शिस्तीचे पालन
हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस. डी. सानप म्हणाले, ‘डिसेंबरचे सरासरी किमान तापमान गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत अधिक नोंदवले जाण्यामागे वेगवेगळी कारणे आहेत. महिन्याच्या सुरुवातीला फेंगल चक्रीवादळामुळे दक्षिणेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांनी वातावरण ढगाळ झाले, तर जवळपास दहा दिवस दक्षिणेकडून येणाऱ्या वाऱ्याच्या प्रभावामुळे थंडी कमी झाली. त्यामुळे महिन्याभरातील सरासरी किमान तापमान अधिक राहिल्याचे दिसून येते. याच महिन्यात कमाल आणि किमान तापमानात घट झाल्याने थंडीचा अनुभवही आला.
डिसेंबरचे सरासरी किमान तापमान
२०२४ – १४.९ अंश सेल्सिअस
२०२३ – १४.३ अंश सेल्सिअस
२०२२ – १४.४ अंश सेल्सिअस
२०२१ – १४.४ अंश सेल्सिअस