पुणे : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खरीप हंगामातील पिकाचे मोठे नुकसान होत आहे. मंगळवारी (२४ सप्टेंबर) आणि बुधवारी (२५ सप्टेंबर) रोजी पडलेल्या पावसामुळे राज्यातील बारा जिल्ह्यांतील ३२९९७.३० हेक्टरवरील पिके मातीमोल झाली आहे. सोयाबीन पिकाचे नुकसान जास्त आहे. कृषी आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात मंगळवारी (२४ सप्टेंबर) आणि बुधवारी (२५ सप्टेंबर) सर्वदूर जोरदार पाऊस पडला. दोन दिवसांत बारा जिल्ह्यांतील ३२९९७.३० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

मराठवाड्याला सर्वाधिक फटका बसला आहे. बीडमध्ये आठ हजार हेक्टर, धाराशिवमध्ये सात हजार हेक्टर, नांदेडमध्ये पाच हजार हेक्टर, छत्रपती संभाजीनगरमध्ये ४ हजार ५०० हेक्टरचे नुकसान झाले आहे. मराठवाड्यानंतर सांगली जिल्ह्यात नुकसानीची तीव्रता जास्त आहे. सांगलीत ४ हजार ८६७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सोलापुरात ३ हजार २०० हेक्टर, पुण्यात ४३० हेक्टर, नगरमध्ये ९१६ हेक्टर, जळगावात ३१७ हेक्टर, नाशिकमध्ये २५ हेक्टर, धुळ्यात १ हजार ७० हेक्टर आणि पालघरमध्ये ५५.८० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

हे ही वाचा… पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवाला धोक्याचा दूरध्वनी आणि पोलिसांची धावपळ; ‘अभियंत्याने’…

सोयाबीन, कडधान्यउत्पादक संकटात

राज्यात दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात खरीप हंगामात सुमारे ५० लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली आहे. विदर्भ, मराठवाड्यात सोयाबीनचे क्षेत्र जास्त आहे. नुकत्याच झालेल्या पावसात मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातील काढणीला आलेले सोयाबीन पीक भिजले आहे. सोयाबीन सलग चार-पाच दिवस भिजल्यामुळे सोयाबीनचे दाणे काळे पडू लागले आहेत. काढणीला मजूर मिळत नाहीत. त्यामुळे शेतातील सोयाबीन तसेच पडून आहे. सोयाबीनपाठोपाठ कडधान्याचे नुकसान झाले आहे. तूरवगळता सर्वच कडधान्याची काढणी अंतिम टप्प्यात आहे. मराठवाडा, विदर्भात पूर्वहंगामी कापसाची वेचणी सुरू झाली आहे, तर सर्वत्र कापसाची बोंडे उमलली आहेत. सतत दोन-तीन दिवस भिजल्यामुळे कापूस काळा पडत आहे. सध्याच्या पावसात सोयाबीन, कडधान्ये, कापूस आणि कांदा पिकांचे नुकसान अधिक आहे.

हे ही वाचा…पुण्यात बुधवारी पडलेल्या पावसाने २१ सप्टेंबर १९३८ रोजीचा विक्रम मोडला; जाणून घ्या, सप्टेंबर महिन्यांतील आजवरच्या पावसाची आकडेवारी

कोसळधारांचा १७ जिल्ह्यांना फटका

राज्यात दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाचा फटका यवतमाळ, अकोला, बुलडाणा, नांदेड, बीड, धाराशिव, जालना, छत्रपती संभाजीनगर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, नगर, जळगाव, नाशिक, पालघर आणि धुळे अशा १७ जिल्ह्यांना बसला आहे. या जिल्ह्यांतील बहुतेक तालुके आणि सर्कलमधील पिके बाधित झाली आहेत. बाधित जिल्ह्यांत सोयाबीन, कडधान्ये, कापूस आणि कांदा पिकाचे क्षेत्र जास्त आहे.

हे ही वाचा…अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा खून; पत्नीसह प्रियकर गजाआड, आरोपींकडून आत्महत्येचा बनाव

मराठवाड्यात मोठे नुकसान

मराठवाड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे काढणीला आलेल्या ४० टक्के सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. पाऊस उघडला तरीही शेतात पाणी साचल्यामुळे सोयाबीन काढता येत नाही. सलग चार-पाच दिवस सोयाबीन भिजल्यामुळे शेंगांमधून कोंब येऊ लागले आहेत. पाऊस उघडला तरीही शेतात वाफसा येत नाही तोपर्यंत सोयाबीनसह कडधान्याची काढणी शक्य नाही. त्यामुळे नुकसानीचे प्रमाण वाढणार आहे, अशी माहिती चाकोली (ता. चाकूर) येथील प्रगतशील शेतकरी रमेश पाटील यांनी दिली.