ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्याचे व त्यांच्या तक्रारी निर्धारित वेळेत सोडविण्याच्या सूचना वरिष्ठ पातळीवरून देण्यात आल्या असल्या, तरी वीजयंत्रणेची प्रत्यक्षातील स्थिती मात्र निराळीच आहे. दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये शहरात विविध ठिकाणी वीज गायब होण्याचे प्रकार होत असताना यंदाच्या पावसाळ्यातही ‘महावितरण’च्या वीजयंत्रणेचे पितळ उघड झाले आहे. दर गुरुवारी यंत्रणेची देखभाल व दुरुस्ती होत असतानाही ही स्थिती निर्माण होत असल्याबाबत ग्राहकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
विजेसंदर्भातील ग्राहकांच्या तक्रारी सोडविण्याच्या दृष्टीने अतिशय सजगपणे काम करण्याच्या सूचना राज्यभरातील विभागांना देण्यात आल्या आहेत. ‘महावितरण’चे व्यवस्थापकीय संचालक अजय मेहता यांनी ‘महावितरण विद्युत वार्ता’च्या माध्यमातून त्याबाबत सविस्तर विवेचन केले आहे. मात्र, स्थानिक पातळीवर तक्रारींबाबत स्थिती अद्यापही सुधारली नसल्याचे दिसते आहे. पावसाळ्याच्या दिवसामध्ये वीज गायब होण्याच्या विविध घटना घडत असतात. पुणे विभागाचा समावेश ‘महावितरण’च्या सर्वोच्च ए-वन गटात करण्यात आला आहे. पुणे विभागाची वसुलीची स्थिती चांगली असून, वीजगळती व चोरीचे प्रमाणही सर्वात कमी आहे. त्यामुळे कोणत्याही अडथळ्यांविना वीज मिळावी, ही ग्राहकांची अपेक्षा आहे. मात्र, ही अपेक्षा फोल ठरत असल्याचे ग्राहकांच्या तक्रारींवरून दिसते आहे.
प्रत्येक पावसाळ्यात वीज गायब होण्याचे प्रकार होतात. यंदा त्यात सुधारणा होईल, अशी अपेक्षा असताना यंत्रणेतील कमकुवतपणाचा फटका ग्राहकांना बसतो आहे. पावसाळ्यात जरासाही वारा आला की वीज जाते, हा अनेकांचा अनुभव आहे. त्यामुळे दर गुरुवारी वीज बंद ठेवून वेगवेगळ्या भागात केली जाणारी दुरुस्ती व देखभालीची कामे तसेच पावसाळ्याच्या पूर्वी करण्यात येणाऱ्या कामांमध्ये नेमके काय केले जाते, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मुळात देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी पुरेसे साहित्यच पुरविले जात नसल्याचे नुकतेच उघड झाले आहे. त्यामुळे ही दुरुस्ती कशी होत असेल, हे उघड सत्य आहे.
विजेबाबत तक्रार करणाऱ्या ग्राहकांना योग्य प्रतिसाद मिळत नसल्याच्याह तक्रारी आहे. अशा तक्रारींबाबत अजय मेहता यांनी ‘विद्युत वार्ता’मध्येही उल्लेख केले आहेत. स्थानिक कार्यालयाशी संपर्क केल्यास प्रतिसाद काही वेळा उत्साहवर्धक नसतो. गरजेच्या वेळी दूरध्वनी लागत नाही किंवा काढून ठेवला जातो, अशाही तक्रारी असल्याचे मेहता यांनीच स्पष्ट केले आहे. ‘महावितरण’च्या कॉल सेंटर क्रमांकावरही तक्रारी देता येते, मात्र त्या ठिकाणीही काही वेळा दूरध्वनी उचलला जात नाही. तक्रारींचा क्रमांक मिळत नाही, अशा अनेक तक्रारी सध्या करण्यात येत आहेत.
ई-मेल व ‘एसएमएस’वरही तक्रार घ्यावी
आधुनिक यंत्रणांच्या काळामध्ये वीजबिल भरणे व इतर काही कामांसाठी संगणक किंवा मोबाइल फोनचा वापर ‘महावितरण’कडून सुरू करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे विजेबाबत करण्यात येणाऱ्या तक्रारी ई-मेल व ‘एसएमएस’च्या माध्यमातूनही घेतल्या गेल्या पाहिजेत, अशी मागणी सजग नागरी मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केली. ‘तक्रार मिळाली नाही’, असे उत्तर काही वेळेला दिले जाते. ही व्यवस्था असल्यास तक्रारींची रीतसर नोंदही होईल, असेही त्यांनी सांगितले.

Story img Loader