पिंपरी-चिंचवड येथे अभ्यासाच्या तणावातून विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. वाल्हेकरवाडीत ही घटना घडली आहे. स्वप्ना पवार असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी स्वप्नाने चिठ्ठी लिहिली होती.

सविस्तर माहिती अशी की, स्वप्ना पवार (वय १७, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड, मूळ रा. लातूर) ही शिक्षण घेण्यासाठी काकांकडे राहायला होती. स्वप्ना बीएस.सीच्या पहिल्या वर्षात तेलंग महाविद्यालयात शिक्षण घेत होती. मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास राहत्या घरातील आतील खोलीत गळफास घेऊन स्वप्नाने आत्महत्या केली. त्यावेळी घरात काकू असल्याचे सांगण्यात येत आहे.

या घटनेची माहिती त्वरीत चिंचवड पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन दरवाजा तोडला आणि स्वप्नाला रुग्णालयात नेले. मात्र तोपर्यंत स्वप्नाचा मृत्यू झाला होता. या आत्महत्येस कोणी जबाबदार नाही. मला अभ्यास जड जात आहे. त्यामुळे मी आत्महत्या करत आहे. तसेच पोलिसांनी कोणाला त्रास देऊ नये असे आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत स्वप्नाने नमूद केलेले आहे. घटनेचा अधिक तपास चिंचवड पोलीस करत आहेत.