पुणे : पुणे – लोणावळा रेल्वे मार्गावरील शिवाजीनगर ते खडकी स्थानकांदरम्यान इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग आणि स्वयंचलित सिग्नलिंग प्रणालीचे काम करण्यात आले. या कामासाठी दोन दिवस ब्लॉक घेण्यात आला. त्यामुळे रविवारी सलग दुसऱ्या दिवशी लोकल सेवेसह अनेक गाड्या रद्द झाल्याचा मोठा फटका प्रवाशांना बसला.
रेल्वेच्या ब्लॉकमुळे शनिवारी (ता.२५) मुंबईहून सुटणाऱ्या काही गाड्या रद्द होत्या. पुणे- तळेगाव -लोणावळा -पुणे दरम्यान धावणाऱ्या सर्व ४६ लोकल गाड्या रद्द होत्या. त्याचबरोबर अनेक गाड्या विलंबाने धावल्याने प्रवाशांचे हाल झाले होते. सलग दुसऱ्या दिवशी रविवारीही प्रवाशांना या ब्लॉकचा फटका बसला. आजही सर्व ४६ लोकल गाड्या रद्द राहिल्या. याचबरोबर पुण्याहून मुंबईला सुटणाऱ्या पुणे – मुंबई डेक्कन क्वीन एक्सप्रेस, पुणे-मुंबई सिंहगड एक्सप्रेस, पुणे – मुंबई – पुणे डेक्कन एक्सप्रेस, पुणे – मुंबई- पुणे इंटरसिटी एक्सप्रेस, मुंबई – कोल्हापूर- मुंबई कोयना एक्सप्रेस या गाड्या रद्द राहिल्या.
आणखी वाचा-दूध दरवाढीसाठी इंदापुरात रस्त्यावर दूध ओतून शेतकऱ्यांचा रास्ता रोको
तसेच, पुणे-जयपूर एक्स्प्रेस, पुणे-मुंबई एक्स्प्रेस, पुणे-एनार्कुलम एक्स्प्रेस, दौंड-इंदोर एक्स्प्रेस या गाड्या सुमारे अर्धा तास ते चार तास विलंबाने धावल्या. याचबरोबर मुंबई-चेन्नई एक्स्प्रेस, काकीनाडा एक्स्प्रेस, मुंबई-भुवनेश्वर कोणार्क एक्स्प्रेस, मुंबई-हैदराबाद एक्स्प्रेस या गाड्याही उशिराने धावल्या. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. प्रवाशांना ऐनवेळी रेल्वेऐवजी इतर पर्यायांचा अवलंब करावा लागला. प्रवाशांना एसटी बसचा अथवा जादा पैसे मोजून कॅबचा वापर करावा लागला.
असा होता रेल्वेचा ब्लॉक…
- एकूण कालावधी – २२ तास
- गाड्या पूर्णपणे बंद – ६ तास
- एकूण रद्द गाड्या – ११२
- विलंबाने धावलेल्या गाड्या – १२