पिंपरी : श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त ७ ते १२ जून दरम्यान आळंदीत औद्योगिक अवजड वाहन आणि चारचाकी वाहनांना प्रवेशबंदी राहणार असल्याची माहिती वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक शहाजी पवार यांनी दिली.
श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे ११ जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. १२ जूनला पालखी पुण्याकडे मार्गस्थ होणार आहे. राज्यभरातून वारकरी पालखी सोहळ्याला उपस्थित राहतात. त्यामुळे आळंदीत वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी पोलिसांनी वाहतुकीचे नियोजन केले आहे. उद्यापासून म्हणजेच ७ ते १२ जूनपर्यंत अवजड, चारचाकी वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे. केवळ अत्यावश्यक सुविधा पुरविणारी आणि दिंडीची वाहने वारी काळात आळंदीत सोडली जाणार आहेत.
हेही वाचा >>>शरद पवारांच्या मध्यस्थीनंतरही शिरूर मतदारसंघाचा तिढा सुटेना? विलास लांडेंच्या वक्तव्यानंतर चर्चेला पुन्हा सुरुवात
औद्योगिक व चारचाकी वाहने आळंदीला न सोडता ती सहा सात किलोमीटर दूरवरच अडवून अन्य मार्गाने वळवली जाणार आहे. औद्योगिक भागातील अवजड वाहने आणि कामगारांना ने-आण करणारी वाहने, शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी वाहने यांना याबाबत पोलिसांकडून वाहतूक नियोजनाबाबत कळवले आहे. पुण्याहून आळंदीला येणारी वाहने मॅक्झिन चौकातून भोसरीमार्गे वळवली जातील. मोशी-देहू फाटामार्गे आळंदीत येणारी वाहने डुडुळगावपुढील हवालदारवस्तीवर अडवली जातील. चाकणहून आळंदीला येणारी वाहने आळंदी फाट्यावर अडवली जाणार आहेत. वडगाव घेनंद-शेलपिंपळगावमार्गे येणारी वाहतूक कोयाळी फाट्यावर अडवली जातील. मरकळ औद्योगिक भागातून येणारी वाहने धानोरे फाट्यावर चऱ्होली बायपासवर अडवली जाणार आहेत. चिंबळी केळगावमार्गे येणारी वाहने चिंबळी फाट्यावरच अडवली जाणार आहेत. आळंदीत वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडी वाहनांना प्रवेश दिला जाईल.
पालखी सोहळ्यानिमित्त अवजड वाहने आणि चारचाकींना उद्यापासून सोमवारपर्यंत आळंदीत प्रवेशबंदी असणार आहे. कामानिमित्त आळंदीतून बाहेर जाणा-या कर्मचा-यांना पास दिले जाणार आहेत.-शहाजी पवार,पोलीस निरीक्षक,वाहतूक विभाग