पिंपरी- चिंचवड: बेरोजगार उच्चशिक्षित तरुणाने नोकरी न मिळाल्यामुळे चोरीचा मार्ग स्वीकारत दहा मोबाईल आणि दोन लॅपटॉप चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. उच्चशिक्षित असलेला तरुण दोन महिन्यापूर्वी कामाच्या शोधात हिंजवडीमध्ये आला होता. इंजिनिअर असल्याने त्याला नोकरी मिळेल अशी आशा होती. परंतु, नोकरी मिळाली नाही. तसेच त्याने शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवल्याने पैशांची गरज होती. या घटनेप्रकरणी निखिलला अटक करण्यात आली आहे.
अखेर त्याने पीजीमध्ये चोरी करण्यास सुरुवात केली. निखिलने आतापर्यंत दहा मोबाईल आणि दोन लॅपटॉप चोरल्याचं पोलीस तपासात उघडकीस आलं आहे. निखिल यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी पीजीमधून मोबाईल आणि लॅपटॉप चोरी झाल्याची घटना घडली होती. या घटनेचा तपास करत असताना पोलीस कर्मचारी कारभारी आणि ओम कांबळे यांना गुप्त बातमीदारामार्फत निखिल हा चोरी करत असल्याचा समजलं. त्याचा शोध घेऊन त्याची अंगझडती घेतल्यानंतर त्याच्याकडे चोरीचा मोबाईल निघाला.
निखिलकडून आतापर्यंत दहा मोबाईल आणि दोन लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून बेरोजगारीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे, आणि ही घटना बेरोजगारीतूनच घडल्याची माहिती समोर आली आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ पांचाळ यांच्या पथकाने केली आहे.