पुणे: शालेय विद्यार्थ्यांमध्ये मूत्रमार्ग संसर्गामध्ये (यूटीआय) मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. यात ४ ते १० वर्षे वयोगटातील मुलांचे प्रमाण अधिक आहे. शाळांमधील अस्वच्छ स्वच्छतागृहांमुळे मुलांना हा संसर्ग होत असून, त्यांना वेदनादायक आजाराचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शाळांनी स्वच्छतागृहांचा दर्जा सुधारावा, असा सल्ला आरोगतज्ज्ञांनी दिला आहे.
अनेक शाळांमधील स्वच्छतागृहे दीर्घकाळ अस्वच्छ राहतात. या अस्वच्छ परिस्थितीमध्ये हानीकारक जिवाणू वाढतात. त्यातून विद्यार्थी ही स्वच्छतागृहे वापरतात तेव्हा मूत्रमार्ग संसर्गाची शक्यता अधिक बळावते. त्यामुळे केवळ आरोग्याला धोका निर्माण होत नाही, तर विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर आणि शैक्षणिक कामगिरीवरही परिणाम होतो. मुलांमध्ये मूत्रमार्ग संसर्गाचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी शाळांमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे आवश्यक आहे, अशी माहिती बालरोगतज्ज्ञांनी दिली.
हेही वाचा… पुण्याच्या पोनिवडणुकाबाबत याचिका करणारे सुघोष जोशी कोण?
सुमारे चार ते १० वर्षे वयोगटातील शाळकरी मुलांना मूत्रमार्ग संसर्गाचा धोका अधिक आहे. या संसर्गाचे प्रमाण पाहिल्यास दोन मुलींमागे एका मुलाला हा संसर्ग होत आहे. तसेच गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे. बऱ्याचदा मूत्रविसर्जन करावे लागू नये यासाठी शालेय विद्यार्थी पाणी कमी पितात किंवा लघवी रोखून धरतात. या दोन्ही बाबी जिवाणूंच्या वाढीस चालना देणारे वातावरण तयार करतात. मूत्रमार्ग संसर्ग केवळ वेदनादायक नसून, त्यावर उपचार न केल्यास त्याचे आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात, असे मदरहूड हॉस्पिटलमधील बालरोगतज्ज्ञ डॉ. अतुल पालवे यांनी सांगितले.
वारंवार लघवी होणे, वेदना किंवा जळजळ होणे, अंथरुण ओले करणे ही मूत्रमार्ग संसर्गाची लक्षणे आहेत. यासाठी पालकांनी जागरूक राहायला हवे. सतत ताप येणे, दुर्गंधीयुक्त लघवी आणि ओटीपोटात दुखणे यांसारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. संसर्ग असल्याची शंका जाणवल्यास वैद्यकीय मदत घेण्याची आवश्यकता आहे. मूत्रमार्ग संसर्गाची समस्या टाळण्यासाठी दररोज तीन लिटर पाणी प्यावे. त्याचबरोबर वैयक्तिक स्वच्छता राखणे गरजेचे आहे, असे अपोलो स्पेक्ट्रा रुग्णालयातील डॉ. सम्राट शाह यांनी स्पष्ट केले.
शालेय मुलींमध्ये मूत्रमार्ग संसर्गाचे प्रमाण अधिक असते. यामागे त्यांची प्रतिकारशक्ती कमी असण्याचे कारण आहे. याचबरोबर शाळांमधील स्वच्छतागृहे अस्वच्छ असल्याने मुलींमध्ये मूत्रमार्ग संसर्गाचा धोका अधिक वाढत आहे. – डॉ. तेजल देशमुख, स्त्रीरोगतज्ज्ञ, मणिपाल हॉस्पिटल