पुणे: शहर आणि परिसराला सोमवारी सायंकाळी अवकाळी पावसाने तडाखा दिला. मात्र त्यानंतर शहरातील तापमानात घट होऊन बुधवारी सकाळी शहरात धुके पसरले होते.
दिवाळीचा कालावधी आणि त्यानंतरचे काही दिवस शहरात हवा प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. फटाके, बांधकामे आणि अन्य कारणांनी हवेची गुणवत्ता खालावून ती अतिवाईट श्रेणीपर्यंत घसरली होती. मात्र त्यानंतर आता शहरातील हवेची गुणवत्ता सुधारून सामान्य स्थितीवर आली आहे. त्याशिवाय हवेत सुखद गारवा निर्माण झाल्याने वातावरण आल्हाददायक झाले आहे. सायंकाळपासूनच हवेत गारवा जाणवू लागला आहे.
हेही वाचा… पिंपरी-चिंचवड मधील प्रदूषण घटले, धुलिकणांचे प्रमाण किती?
या पार्श्वभूमीवर बुधवारची सकाळ धुक्याच्या दुलईत उजाडली. शहराच्या विविध भागांमध्ये दाट धुके पसरल्याचे चित्र होते. मोठमोठ्या इमारतींचे वरचे मजले धुक्यात हरवून गेल्याचे पाहायला मिळाले. सकाळीच व्यायामासाठी फिरायला बाहेर पडणाऱ्या नागरिकांना या धुक्याचा अनुभव घेता आला.