लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: मार्च आणि एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील ६९९.३२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने प्राथमिक नुकसानीची माहिती दिली आहे. प्रत्यक्ष पंचनामे केल्यानंतर नुकसानीचा आकडा वाढू शकणार असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.
गेल्या महिन्यात ७ ते १५ मार्च या कालावधीत जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. हा पाऊस शिरूर, खेड, आंबेगाव, इंदापूर, दौंड, भोर, मुळशी, वेल्हा, मावळ आणि हवेली या तालुक्यांमध्ये पडला. या पावसामुळे तब्बल ८९ गावांतील पिकांचे नुकसान झाले आहे. मार्च महिन्यात ४३९.९ हेक्टरवर नुकसान झाले आहे. एप्रिल महिन्यात ७, ८ आणि १३ एप्रिल या कालावधीत अवकाळी पाऊस पडला. ७ आणि ८ एप्रिल रोजी जिल्ह्यातील १९ गावांतील २३०.८४ हेक्टरवरील ७०१ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच १३ एप्रिल रोजी शिरूर, दौंड, भोर, मुळशी, खेड, हवेली, इंदापूर आणि वेल्हा या तालुक्यांमधील ३३ गावांतील १४० शेतकऱ्यांच्या जिरायती क्षेत्र ३.९३ हेक्टर, बागायती क्षेत्र १०.९ हेक्टर, फळपीक १३.७५ हेक्टर अशा एकूण २८.५८ हेक्टर क्षेत्रावरील नुकसान झाले आहे.
आणखी वाचा- पुणे: दोन हजार पदांच्या भरतीसाठी शुक्रवारी महारोजगार मेळावा
दरम्यान, मार्च आणि एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा, आंबा, बाजरी, मिरची, पपई, केळी, अंजीर, भाजीपाला, ज्वारी, गहू, फुले, द्राक्ष, दोडका, कलिंगड, टोमॅटो आदी शेती आणि फळपिकांचे नुकसान झाले आहे, असेही जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
पंचनाम्याला विलंब
गेल्या महिन्यात राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी जुन्या निवृत्तिवेतनाच्या मागणीसाठी सलग आठ ते दहा दिवस संप पुकारला होता. त्यामुळे मार्च महिन्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास विलंब झाला. तसेच एप्रिल महिन्यातही तीन दिवस अवकाळी पाऊस झाला असून अद्याप पंचनामे करण्याची कार्यवाही पूर्ण झालेली नाही. त्यामुळे पंचनामे पूर्ण होऊन नुकसानीचा आकडा समजल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून राज्य सरकारकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.