सलग दुसऱ्या वर्षांच्या दुष्काळामुळे उजनी जलाशय आटू लागल्याने इंदापूरजवळील पळसनाथाचे प्राचीन मंदिर सध्या उघडे पडले आहे. शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले हे मंदिर २००१ सालानंतर आता पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे.
साधारणपणे १९७७-७८ च्या सुमारास उजनी धरणात पाणी साठू लागताच भिगवण ते कांदलगाव दरम्यान नदीकिनारी असलेल्या परिसरातील अनेक गावे या धरणाच्या पाण्याखाली गेली. यामध्ये पळसदेव, काटेवाडी परिसरातील अनेक मंदिरेही पाण्याखाली गेली. यामध्ये येथील श्री पळसनाथ मंदिराचाही समावेश होता. हे गाव या धरणात जाताना त्या वेळी ग्रामस्थ व भाविकांकडून हळहळ व्यक्त करण्यात आली. हेमाडपंती बांधणीतील सभामंडप, सप्तभूमीज पद्धतीचे शिखर, कोरीव छत, गर्भगृह, अशा स्वरूपातील हे मंदिर इतिहास व मूर्तिशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे होते. हे मंदिर बुडाल्यानंतर २००१ साली पहिल्यांदाच उघडे पडले होते. त्यानंतर आता बार वर्षांनंतर ते पाहायला मिळणार आहे.
उजनी धरणाच्या जलसाठय़ात १९७८ मध्ये या मंदिराला जलसमाधी मिळाली. तत्कालीन पुनर्वसनमंत्री शंकरराव पाटील यांनी पळसदेवच्या ग्रामस्थांना या मंदिराच्या नुकसानभरपाईपोटी भरीव रक्कम मिळवून दिली. त्यातून पळसदेव येथे नव्या गावठाणात श्री. पळसनाथाचे नवे मंदिर उभारले. मूळ मंदिरातील शिवलिंग व देवळातील नंदीची स्थापना नव्या मंदिरात केली. आजही प्राचीन काळापासून चैत्र पौर्णिमा व महाशिवरात्रीस भाविक या मंदिरात दर्शनासाठी येतात.
हे मंदिर चालुक्यकालीन असावे असा अभ्यासकांचा दावा आहे. फलटणचे राजे निंबाळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख मिळतो. तसेच या काळातच या मंदिराभोवती तट व ओवऱ्या बांधल्या गेल्या. चालुक्यकाळातील काही शतकांपूर्वी बांधण्यात आलेले हे मंदिर पाण्याखाली असूनही आजही बऱ्यापैकी सुस्थितीत आहे. या मंदिराला भेट देण्यासाठी पळसदेव गावातून जलाशयाकडे रस्ता जातो. मात्र, काही अंतर नावेतून पार करावे लागते. या मंदिराला भेट देताना प्राचीन मंदिर अनेक दिवस पाण्याखाली असल्याने सावधानता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Due to very low water level in ujani dam temple of palasnath is open to observe
Show comments