‘अण्णा भाऊ साठे यांच्या योगदानामुळे आज ‘महाराष्ट्रा’मध्ये आपण आहोत. साहित्य क्षेत्रातील त्यांचे योगदानही मोठे आहे. त्यांची जयंती ही महाराष्ट्रातील सर्व घटकांनी एकत्र येऊन केली पाहिजे,’ असे मत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार’ वितरण समारंभामध्ये रविवारी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य मातंग समाज संघटनेच्या वतीने लोकशाही अण्णा भाऊ साठे पुरस्कार देण्यात आले. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर आणि लातूर येथील विवेकानंद रुग्णालयाचे संस्थापक डॉ. अशोक कुकडे यांना राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला. महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक पराग करंदीकर, दैनिक केसरीचे कार्यकारी संपादक सुकृत खांडेकर, समता परिषदेचे अध्यक्ष कृष्णकांत कुदळे, ज्येष्ठ समाजसेवक अंकल सोनावणे, प्रसिद्ध समीक्षिका नीलिमा गुंडी यांना जिल्हास्तरीय पुरस्कार देण्यात आले. या वेळी शिवेसेनेच्या प्रवक्तया आमदार नीलम गोऱ्हे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू तुकाराम मोरे, भाजप अध्यक्ष अनिल शिरोळे, आमदार महादेव बाबर, माधुरी मिसाळ, महाराष्ट्र राज्य मातंग समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप कांबळे आदी उपस्थित होते.
या वेळी मुंडे म्हणाले, ‘युती शासनाच्या काळातच समाजातील वंचित घटकांना न्याय मिळत होता. पुढील वर्षी सत्तेतील पक्षाचा नेता म्हणून कार्यक्रमाला येईन. मी येईपर्यंत नीलमताईंनी खिंड लढवली, त्यांनी खिंड लढवली म्हणून मी येऊ शकलो. अशीच जर युती राहिली, तर पुढील वर्षी सत्तेतही नक्कीच येऊ.’
या वेळी गोऱ्हे म्हणाल्या, ‘फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घेऊन चालणाऱ्या राज्यामध्ये महिला सुरक्षित नाहीत. महिलांना निर्भीडपणे फिरता यावे असा कायदा आणि सुव्यवस्था आपल्याकडे नाही. याबाबत शासन अपयशी ठरले आहे.’
या वेळी आठवले म्हणाले, ‘अण्णा भाऊंनी केलेले समाजशिक्षण हे खूप मोठे कार्य होते. पदव्या किती घेतो यावर शिक्षण अवलंबून नसते, हे सिद्ध झाले. आंबेडकर आणि अण्णा भाऊंच्या समर्थकांनी एकत्र येऊन समाजव्यवस्थेविरुद्ध लढा दिला पाहिजे.’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा