पुणे : कात्रज चौकातील उड्डाणपुलाच्या कामानिमित्त मंगळवारपासून (३ डिसेंबर) या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. या भागातील एसटी, पीएमपी, तसेच खासगी प्रवासी बस वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कात्रज चौकातील उड्डाणपुलाचे काम (सेगमेंटल लाॅन्चिंग) करण्यात येणार आहे. त्यामुळे या भागातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात येणार आहेत, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली. या भागातून जाणाऱ्या जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. साताऱ्याकडून जुन्या कात्रज घाटातून येणाऱ्या वाहनांना शिंदेवाडी पुलाजवळ प्रवेश बंद करण्यात येणार आहे. सातारा रस्त्यावरून नवीन बोगद्यामार्गे (बाह्यवळण मार्ग) कात्रज चौकाकडे येणाऱ्या वाहनांना नवले पूल चौकात प्रवेश बंद करण्यात येणार आहे. मुंबईहून बाह्यवळण मार्गे कात्रज चौकाकडे येणाऱ्या वाहनांना नवले पूल चौकातून प्रवेश बंद करण्यात येणार आहे. सोलापूर रस्त्याने सासवड रस्तामार्गे मंतरवाडी चौकातून कात्रजकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. सासवडकडून कात्रज चौकाकडे येणाऱ्या वाहनांना खडी मशिन चौकात प्रवेश बंद करण्यात येणार आहे. बोपदेव घाटातून कात्रजकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे.

हेही वाचा…वर्तुळाकार रस्ता प्रकल्पाचे अनधिकृत भूमिपूजन?

मार्केट यार्ड, गंगाधाम चौक, बिबवेवाडीमार्गे कात्रज चौकात येणाऱ्या वाहनांना इस्काॅन मंदिर चौकातून प्रवेश बंद करण्यात येणार आहे. स्वारगेटकडून कात्रजकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. मंतरवाडी, उंड्री, पिसोळी भागातील स्थानिक जड वाहतुकीस रात्री दहा ते पहाटे चार या वेळेत परवानगी देण्यात आली आहे. कात्रज-कोंढवा रस्त्यावरील इस्काॅन मंदिर चौकातून सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. पुढील आदेशापर्यंत या भागातील वाहतूक व्यवस्थेत हा बदल राहील.

हेही वाचा…पिंपरी-चिंचवडमध्ये ‘खाकी वर्दी’च असुरक्षित?

एसटी बस, खासगी प्रवासी वाहनांसाठी सूचना

मुंबईकडून वारजे, नवले पूलमार्गे कात्रजकडे येणाऱ्या एसटी बस, तसेच प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसला प्रवेश बंद करण्यात येणार आहे. साताऱ्याहून स्वारगेटकडे येणाऱ्या एसटी बस, तसेच खासगी बसचालकांनी नवले पुलाखालून उजवीकडे वळून कात्रजकडे यावे. तेथून स्वारगेटकडे जावे. कात्रज भागातील मांगडेवाडी, दत्तवाडी, हांडेवाडी भागातील रहिवाशांनी स्वारगेटकडे जाण्यासाठी शक्यतो पर्यायी मार्गाचा वापर करावा. या भागातून जाणारी पीएमपी बस वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. पुढील आदेशापर्यंत कात्रज चौकातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे, असे आवाहन वाहतूक शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Due to work of flyover at katraj chowk there is change in traffic system in this area from tuesday december 3 pune print news rbk 25 sud 02