गडकोट हे आगळेवेगळे वैशिष्टय़ असलेला प्रदेश ही महाराष्ट्राची ओळख आहे. छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पराक्रमाने पावन झालेल्या या गडांची अवस्था बिकट असून त्यांच्या संवर्धनासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत. सह्य़ाद्री प्रतिष्ठानतर्फे राज्यभरातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी आणि त्यांच्या जतनासाठी काम करणाऱ्या महाराष्ट्रातील संस्थांची २ मे रोजी ठाणे येथील सहयोग मंदिर येथे राज्यस्तरीय दुर्गसंवर्धन बैठक आयोजित करण्यात आली आहे.
राज्यभरात वेगवेगळ्या संस्था आपल्या परीने गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी कार्यरत आहेत. मात्र, या संस्थांमध्ये सुसंवाद नाही. त्यामुळे गडांचे संवर्धन करणाऱ्या या शिलेदारांमध्ये संवाद घडावा आणि हे काम एकजिनसीपणाने पुढे जावे हाच या बैठकीमागचा उद्देश असल्याची माहिती सह्य़ाद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे यांनी गुरुवारी दिली. २ मे रोजी होणाऱ्या या बैठकीला युवराज संभाजीराजे, नितीन बानुगडे-पाटील, मोहन शेटे, रवींद्र यादव, सायली पलांडे-दातार, गिरीश जाधव, प्रमोद मांडे, प्रवीण भोसले यांच्यासह पांडुरंग बलवकडे आणि भगवान चिले हे राज्य सरकारच्या दुर्गसंवर्धन समितीचे सदस्य या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत.
राज्य सरकारने स्थापन केलेली दुर्गसंवर्धन समिती ही दुर्गसंवर्धनाचे काम करणार आहे. मात्र, याच कामासाठी कार्यरत असलेल्या संस्था सरकारच्या समितीला पूरक असेच काम करणार आहेत, असेही गोजमगुंडे यांनी सांगितले. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात जाऊन सामाजिक काम करावे लागते. त्याला गडकिल्ल्यांची सफाई आणि संवर्धनाची जोड दिली गेली तर ते काम अधिक उपयुक्त ठरेल, असे इतिहासप्रेमी मंडळाचे मोहन शेटे यांनी सांगितले.
दुर्गसंवर्धन क्षेत्रातील संस्थांची २ मे रोजी राज्यस्तरीय बैठक
राज्यभरात वेगवेगळ्या संस्था आपल्या परीने गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी कार्यरत आहेत. मात्र, या संस्थांमध्ये सुसंवाद नाही. त्यामुळे...
आणखी वाचा
First published on: 24-04-2015 at 03:00 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Durga samvardhan meeting thane fort