पिंपरी: दिवाळीत पिंपरी-चिंचवडकरांनी वाहन खरेदीला मोठी पसंती दिली. सात दिवसांत पाच हजार ३१३ वाहनांची पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) नोंदणी झाली. त्यातून २९ कोटी ८६ लाख ८७ हजार रुपयांचा महसूल मिळाला आहे.
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिक आधीपासूनच वाहनाची नोंदणी करून ठेवतात. सात दिवसांत परिवहन कार्यालयाकडे पाच हजार ३१३ वाहनांची नोंदणी झाली. यामध्ये तीन हजार १०५ दुचाकी, एक हजार ७९८ कार तर इतर ४१० वाहनांचा समावेश आहे. आगाऊ नोंदणी करून ठेवल्यानंतर दिवाळीच्या मुहूर्तावर ग्राहकांनी वाहने घरी नेली. सर्वच वाहनांची यावर्षी खरेदी मोठ्या प्रमाणात झाली. शून्य पैसे, कमीत कमी पैसे, कर्ज योजना, आकर्षक हप्त्यांची सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. वाढत्या इंधन दरवाढीमुळे इलेक्ट्रिक वाहनांची विक्री वाढली.
हेही वाचा… अखेर देहूच्या नगराध्यक्षांचा राजीनामा, अविश्वास ठराव मागे
गतवर्षी दिवाळीत चार हजार ५१६ वाहनांची नोंदणी झाली होती. यामधून २३ कोटी १६ लाखांचा महसूल मिळाला होता. यंदा दिवाळीत पाच हजार ३१३ वाहनांची नोंदणी झाली. यामधून २९ कोटी ८६ लाख ८७ हजार रुपयांचा महसूल मिळाल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी सांगितले.