लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : पुण्याचा गणेशोत्सव देशभरात प्रसिद्ध आहे. या काळात पुण्यात देश-परदेशातून भाविक दाखल होत असतात. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवात पावसाबाबत खास अंदाज पुणे वेधशाळेकडून प्रसृत केला जाणार आहे. हा अंदाज हवामान विभागाच्या संकेतस्थळावर दिला जाणार आहे.
दरम्यान, घाटमाथ्यावर रविवारी (१७ सप्टेंबर) मुसळधार पावसाचा नारंगी इशारा देण्यात आला आहे. शहर आणि परिसरातही आकाश ढगाळ राहून हलक्या पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे.
आणखी वाचा-Monsoon Update: राज्यात आजपासून चार दिवस जोरधारांचा अंदाज
शनिवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. आकाशात ढगांची गर्दी झाली होती आणि गार वारा सुटला होता. परिणामी शहरात पावसाळी वातावरण तयार झाले होते. दुपारनंतर शहर आणि उपनगरांत हलक्या सरी कोसळल्या. रविवारी घाटमाथ्यावर नारंगी इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शहर आणि परिसरातही पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवात पुणे वेधशाळेकडून दररोज शहरातील पावसाचा विशेष अंदाज देण्यात येणार आहे. गणेशोत्सवात शहरात पावसाळी वातावरण राहणार आहे. आगामी सहा दिवस शहरात पावसाचा अंदाजही देण्यात आला आहे.
आणखी वाचा-पुण्यात गणेशोत्सवामध्ये अग्निशमन दलाकडून अग्निसुरक्षित गणेश मंडळ स्पर्धा
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शहरात तापमानाचा पारा चांगलाच वाढला होता. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात कडक उन्हाचा तडाखा बसत होता. शुक्रवारी (१५ सप्टेंबर) दुपारनंतर शहरात ढगांची गर्दी झाली. त्यामुळे तापमानात घट झाली आहे.