पुणे : गणेशोत्सवाच्या काळात शहरातील रस्ते सायंकाळी पाच नंतर वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याने पीएमपीच्या ६६ मार्गातही बदल करण्यात आले आहेत. पीएमपीकडून स्थानक निहाय पर्यायी रस्त्यांचा वापर करण्यात येणार आहे.
गणेशोत्सवाच्या कालावधीत शनिवारपासून (७ सप्टेंबर) १७ सप्टेंबर पर्यंत देखावे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. त्यामुळे शहरात वाहतुकीची कोंडी निर्माण होते. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांकडून शहराच्या मध्यवर्ती भागातील रस्ते बस तसेच अन्य वाहतुकीसाठी सायंकाळी पाच नंतर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थी, नोकरदार, कामगार, भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पीएमपीकडून मार्गातील संचलनात बदल करण्यात आला आहे.
हे ही वाचा…पुणे : विसर्जन मिरवणूक रद्द करून गणशोत्सवात आरोग्य जागर
शिवाजी रस्त्यावरून स्वारगेटकडे जाणाऱ्या गाड्या शिवाजी रस्त्याऐवजी जंगली महाराज रस्ता, बालगंधर्व, डेक्कन, संभाजी पूल मार्गे टिळक रस्त्याने स्वारगेटकडे जाणार आहेत. टिळक रस्ता वाहतुकीस बंद झाल्यानंतर या मार्गावरील गाड्या शास्त्री रस्त्याने दांडेकर पूल येथे येतील आणि त्यानंतर मित्रमंडळ चौक मार्ग लक्ष्मी नारायण चौकातून नेहमीच्या मार्गाने मार्गस्थ होतील. स्वारगेटहून शिवाजीनगरकडे जाताना बाजीराव रस्त्यावरील वाहतुकीत कोणतेही बदल करण्यात आले नसल्याचे पीएमीपकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मार्ग क्रमांक तीन आणि सहा उत्सव काळात बंदच ठेवण्यात येणार आहेत.
तर मार्ग क्रमांक ५५चा रस्ता बंद काळात शनिपार-मंडई ऐवजी नटराज स्थानकावरून सोडण्यात येणार आहेत. या बसचा मार्ग अंबिल ओढा काॅलनी, सेनादत्त पोलीस चौकीमार्गे असेल. मार्ग क्रमांक ५८ आणि ५९ च्या गाड्या डेक्कन जिमखाना येथून सोडण्यात येणार असून कोथरूड येथून पुणे रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या मार्गात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र पुणे स्टेशनकडून येताना ससून रुग्णालय, मालधक्का, जुना बाजार, महापालिका भवन, काँग्रेस भवन, बालगंधर्व, डेक्कन बसस्थानक, खंडूजी बाबा चौक येथून पुढे मार्गस्थ होतील.
हे ही वाचा…खुनाच्या प्रयत्नातील पसार आरोपी दोन तासात जेरबंद
कोंढवा गेट येथून पुणे स्थानकाकडे जाताना केळकर सत्याने अप्पा बळवंत चौक मार्गे माल महाल येथून देवजी बाबा मंदिर चौक, गुरूद्वारा रस्ता मार्गे हमजे खान चौकातून पुढे जातील. पुणे स्थानकाकडून कोंढवा गेटकडे येताना लक्ष्मी रस्ता वाहतुकीस बंद असेल तर, माॅर्डन बेकरी चौकातून सेव्हन लव्हजमार्गे स्वारगेट येथे येतील आणि तेथून नेहरू स्टेडियम मार्गे टिळक रस्त्याने डेक्कनकडे जातील. शास्त्री रस्ता बंद झाल्यानंतर मार्ग क्रमांक १२, ४२ आणि २९९ च्या गाड्या दांडेकर पूल सेनादत्त पलीस चौकी, म्हात्रे पूलावरून कर्वे रस्त्याने डेक्कन पुढे जाणार आहेत. हा बदल रस्ते बंद झाल्यानंतर सायंकाळी पाच वाजल्यानंतर होणार आहे, असे पीएमपीकडून कळविण्यात आले आहे.