पिंपरी : श्री क्षेत्र देहूहून पंढरपूरला जाणाऱ्या वारीसोबत यंदा जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकारामांचे जीवनचरित्र एकपात्री प्रयोगातून सादर करण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. ३३८ व्या पालखी सोहळ्यानिमित्त संवाद, पुणे व सावित्रीबाई फुले विद्यापीठ – राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमांतर्गत वारीच्या मार्गावर जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनाचे दर्शन घडविणारा, अभिनेते योगेश सोमण यांच्या अभिनयातून साकारणारा एकपात्री नाट्यप्रयोग ‘आनंदडोह’ चे एकूण १५ प्रयोग होणार आहेत. वारीतील शुभारंभचा प्रयोग श्रीक्षेत्र देहू येथील अभंग स्कूलमध्ये पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
संत साहित्याचे अभ्यासक डॉ.सदानंद मोरे, माजी राज्यमंत्री संजय भेगडे, संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, देहूच्या नगराध्यक्षा स्मिता चव्हाण, विश्वस्त माणिक महाराज मोरे, संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रसेवा योजनेचे सल्लागार राजेश पांडे, सृजन फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील कंद, सचिव प्रा. विकास कंद, शाळेच्या प्राचार्या डॉ. कविता अय्यर उपस्थित होते.
हेही वाचा… जगद्गुरू तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहू सज्ज; हजारो वारकरी देहूत दाखल
पालखी सोहळ्यादरम्यान आरोग्यवारी आणि आनंदवारी यांची सांगड घालत माणसांमध्ये परमेश्वर पहायला शिकविणारा वारकरी संप्रदायाचा विचार वर्षानुवर्षे चालू राहणार आहे, असा विश्वास करत पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, वारीच्या मार्गावर वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी आरोग्यवारी तसेच संत तुकारामांचा जीवनपट उलगडणारे ‘आनंदडोह-आनंदवारी’ हा उपक्रम कौतुकास्पद आहे. आजपर्यंत शासनाकडून ११ हजार कोटी रुपयांचा निधी पालखी मार्गासाठी उपलब्ध करून दिला आहे. यावर्षी देखील वारकऱ्यांना रेनकोट, राहण्यासाठी तंबू, प्रवासात उपयोगाला येणारी बॅग अशा साहित्याचे वाटप करुन पालखीची जय्यत तयारी झाल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा… वारी निमित्त आळंदीत अभूतपूर्व व्यवस्था, एकाच वेळी १५ हजार वारकरी घेणार माऊलीचे दर्शन
देहू ते पंढरपूर या आरोग्यवारीचे उद्घाटन करण्यात आले. या आरोग्यवारी मार्फत वारकऱ्यांचे मोफत कर्करोग, रक्त व साखर तपासणी केली जाणार आहे. त्यांचे अहवाल तात्काळ देण्यात येतील अशी माहिती यावेळी देण्यात आली. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनाचे अतिशय ह्रदय व भावस्पर्शी सादरीकरण अभिनेते योगेश सोमण यांनी केले.