पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या नाकाबंदीत मुंबईहून पुण्यातील सराफ व्यावसायिकांना पाठविण्यात आलेले चार कोटी १६ लाख रुपयांचे चार किलो चांदी, तसेच एक कोटी ५७ लाख रुपयांचे दोन किलो असा ऐवज जप्त करण्यात आले. पोलिसांनी याबाबतची माहिती प्राप्तीकर विभाग, वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) विभागातील अधिकाऱ्यांना दिली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या वेगवेगळ्या भागात नाकाबंदी लावण्यात आली आहे. ओैंध येथील राजीव गांधी पुलावरुन शनिवारी सकाळी एक वाहन पुण्याकडे निघाले होते. नाकाबंदीतील पोलिसांनी वाहन तपासणीसाठी अडवले. तपासणीत वाहनात चार किलो ४७९ ग्रॅम चांदी आणि दोन किलो ५११ ग्रॅम सोने सापडले. जप्त केलेल्या सोन्या चांदीचे किंमत पावणेसहा कोटी रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा >>>“महेश लांडगे यांचा कुणी बालही बाका करू शकत नाही”, असं देवेंद्र फडणवीस का म्हणाले?
पोलिसांनी चैाकशीसाठी एकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेले सोने आणि चांदी शहरातील सराफ व्यावसायिकांना देण्यात येणार होते. याप्रकरणी प्राप्तीकर विभाग, तसेच वस्तू आणि सेवा कर विभागातील अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात येत आहे. एका कुरिअर कंपनीमार्फत पुणे, कोल्हापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर येथील सराफ व्यावसायिकांना सोने, चांदी पोहचिवण्यात येणार असल्याची माहिती चौकशीत मिळाली आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाची नोंद चतु:शृंगी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून शहर, परिसरात गस्त वाढविण्यात आली आहे. पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीत सहकारनगर भागातून तब्बल १२८ कोटी रुपयांचे सोने नुकतेच जप्त करण्यात आले होते. पोलिसांनी नाकांबदी दरम्यान पकडलेले सोने शहरातील सराफ व्यावसायिकांचे होते. त्यांनी मुंबईतील कारागिरांकडून सोन्याचे दागिने घडवून आणले होते.