पुणे : ब्रिटीश कालखंडापासून असलेल्या सोमवार पेठ पोलीस वसाहतीने शताब्दी वर्षात पदार्पण केले आहे. त्यानिमित्त रविवारी आयोजित सोहळ्यात ज्येष्ठ क्रिकेटपटू चंदू बोर्डे रमले. पोलीस वसाहतीत क्रिकेटचे बाळकडू मिळालेल्या बोर्डे यांनी गतस्मृतींना उजाळा दिल्या. पोलीस वसाहतीतील छोट्या खोलीत व्यतीत केलेले दिवस आणि बालपणीच्या मित्रांच्या आठवणीत ते रमले.

ब्रिटीशकालीन सोमवार पेठ पोलीस वसाहतीची स्थापना २० ऑक्टोबर १९२४ मध्ये झाली. शहराच्या मध्यभागात असलेल्या सोमवार पेठ वसाहतीच्या परिसरात त्याकाळी गर्द झाडी होती. आजूबाजूला शेती होती. शहराचा विस्तार वाढल्यानंतर पोलीस वसाहतीच्या परिसरात इमारती उभ्या राहिल्या. त्याकाळी वसाहतीत बैठी घरे होती. कालानुरुप वसाहतीचे स्वरुप बदलले. बैठ्या घरांसमोर वसाहतीत इमारती उभ्या राहिल्या. पोलीस वसाहतीतील जीवन काहीसे निराळे असते. जाती धर्माच्या पलिकडे जाऊन एकोप्याने राहतात. सर्वधर्मीयांचे उत्सव उत्साहात साजरे केले जातात.

हेही वाचा – विद्यापीठांच्या धर्तीवर शाळांनाही स्वायत्तता, काय आहे नवी तरतूद?

सोमवार पेठ पोलीस वसाहत शताब्दी सोहळा आणि गुणगौरव समितीकडून रविवारी वसाहतीच्या प्रांगणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास चंदू बोर्डे, भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक राजेंद्र गोळे, अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोर्डे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. महापालिकेच्या उपायुक्त किशोरी शिंदे यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. वसाहतीत राहणारे पोलीस कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय, तसेच वसाहतीतून बाहेर वास्तव्यास असलेले माजी पोलीस कर्मचारी, अधिकारी, त्यांचे कुटुंबीय या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

पोलीस वसाहतीत क्रिकेटचे बाळकडू मिळाले. वडील पोलीस दलात होते. वसाहतीतील प्रत्येकांशी घरोब्याचे संबंध होते. पोलीस वसाहतीतील मिळालेल्या अनुभवातून खूप काही शिकायला मिळाले, असे बोर्डे यांनी सांगितले. वसाहतीतील जुन्या मित्रांची नावे आणि त्यांच्याबरोबर केलेली मजा अशा जुन्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. गोळे आणि तरडे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.

हेही वाचा – मुळशीतील खांबोली तलावात बुडून महाविद्यालयीन तरुणांचा मृत्यू

सोमवार पेठ पोलीस वसाहत शताब्दी सोहळा समितीचे अध्यक्ष अनिल जगताप, उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण, संयोजत दिलीप शिंदे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

‘लाईनबाॅय’ रमले आठवणीत

पोलीस वसाहतीत राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलांना ‘लाईनबाॅय’ असे म्हटले जाते. पोलीस वसाहतीतून बाहेर पडलेल्या अनेकांनी वेगवेगळ्या क्षेत्रात कामगिरी केली. काहींनी शासकीय नोकरी मिळवल्या, तसेच काही अधिकारी झाले. काहींनी व्यवसायात जम बसवला. शताब्दी सोहळ्यानिमित्त रविवारी आयोजित करण्यात आलेले ‘लाईनबाॅय’ कुटुंबीयांसह एकत्र आले. जुन्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.