सणासुदीत मार्केट यार्डातील शिवनेरी रस्त्यावर होणारी कोंडी सोडविण्यात बाजार समिती आणि महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाला यश आले. गजबजलेल्या शिवनेरी रस्त्यावर दुतर्फा बेकायदा किरकोळ व्यवसाय करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आल्याने शिवनेरी रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली.
गणेशोत्सव, नवरात्रोत्सव तसेच दिवाळीत मार्केट यार्डातील शिवनेरी रस्त्यावर फुले, पूजा साहित्य विक्री करणारे विक्रेते ठाण मांडतात. किरकोळ विक्रेत्यांच्या अतिक्रमणांमुळे शिवनेरी रस्त्यावर कोंडी होती. सातारा रस्त्यावरील उत्सव हॅाटेल चौक ते मार्केट यार्डातील मुख्य प्रवेशद्वारापर्यंत ठिकठिकाणी कोंडी होती. बाजारात खरेदीसाठी आलेल्या खरेदीदारांना कोंडीत अडकून पडावे लागते. शिवनेरी रस्त्यावरील अतिक्रमणांवर बाजार समिती आणि महापालिका प्रशासनाने यापूर्वी कारवाई केली होती. कारवाईत सातत्य ठेवल्याने यंदा गणेशोत्सवात शिवनेरी रस्त्यावरील कोंडी सोडविण्यात यश आले, अशी माहिती पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी दिली.
सातारा रस्त्यावरील उत्सव हॅाटेल ते मार्केट यार्डातील टपाल कार्यालय चौकापर्यंत वाहनचालकांना सणासुदीच्या काळात कोंडीत अडकून पडावे लागत होते. पाच मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी किमान एक तास वेळ लागत होता. शिवनेरी रस्त्यावरील अतिक्रमणांवर कारवाई केल्याने कोंडी झाली नाही. या भागात बेकायदा शेतीमाल तसेच पूजा साहित्याची विक्री करु नये, असे आवाहन गरड यांनी केले आहे.
गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळीत शिवनेरी रस्त्यावर कोंडी होते. महापालिका आणि बाजार समितीच्या पथकांनी कारवाई केल्याने शिवनेरी रस्ता तसेच नेहरु रस्त्यावर कोंडी झाली. या भागात बेकायदा शेतीमाल तसेच पूजा साहित्याची विक्री केल्यास माल जप्त करण्यात येईल. – मधुकांत गरड, प्रशासक, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती