मुकुंद संगोराम mukund.sangoram@expressindia.com

एकदा का लाज सोडली, की कोण काय म्हणतो, याचे सोयरसुतक राहत नाही. त्यामुळे डोळे मिटून पाप करण्याचीही गरज पडत नाही. पुणे महापालिका आपल्या सगळ्यांकडून जो कर वसूल करते आणि जो आपणही अतिशय काळजीपूर्वक भरतो, त्या पैशांचे नेमके काय होते, हे समजण्याचा आपल्या सगळ्यांना अधिकार आहे. तो अधिकार महापालिकेतील सगळे राजकारणी दडपून टाकत आहेत. त्यांची सगळी कृष्णकृत्ये लपून राहण्यासाठी ते आपल्या सगळ्यांच्या डोळ्याला पट्टय़ा बांधत आहेत. आपणही असे मूर्ख, की त्यांच्याकडून जी किरकोळ प्रलोभने दाखवण्यात येतात, त्याला आपण सगळे बळी पडतो. आपल्याच पैशातून त्यांची रोजच्या रोज दिवाळी होते आहे, याचे भान आपल्याकडे नाही, त्यामुळे त्यांच्या चांदीत आपल्या अज्ञानाचाही मोठा वाटा असतो, हे नागरिकांनी लक्षात घेतलेच पाहिजे.

सोसायटय़ा-सोसायटय़ांमध्ये ओला आणि सुका कचरा गोळा करणाऱ्या ज्या मोठय़ा बकेट्स असतात, त्या प्रभागातील नगरसेवकांकडून सप्रेम भेट आलेल्या असतात. त्यावर त्या नगरसेवकाचे भले मोठे नाव लिहिलेले असते. असे हे प्रात:स्मरणीय नाव पाहून आपल्याला जणू ही बकेट नगरसेवकानी पदरमोड करून दिली असावी, असे वाटू शकते. आपल्याच पैशावर डल्ला मारून ती खरेदी केलेली असते हे आपल्या लक्षातही येत नाही. हा मूर्खपणा थांबवण्याचे पालिका प्रशासनाने ठरवले, तेव्हा एक शिवसेना वगळता, सर्व राजकीय पक्षांनी तो हाणून पाडायचा चंगच बांधला. करातून मिळणाऱ्या उत्पन्नाचे काय करायचे, ते आम्हीच ठरवणार, असा त्यांचा रोख. तो निर्लज्जपणाचा आहे, यात शंका असण्याचे कारणच नाही. पण वस्तूवाटप हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे, असे नगरसेवक कसे काय म्हणू शकतात? त्यांना जाब विचारणारे कोणी आहे की नाही?

नगरसेवक किती निर्ढावलेले आहेत, हे खरेतर वेगळे सांगण्याची आवश्यकताच नाही. कारण त्यांना जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी फक्त हितसंबंध दिसतात. मुलामा मात्र विकासाचा. त्यामुळे वस्तूवाटप हवेच म्हणणारे हेच नगरसेवक जेव्हा आपापल्या प्रभागातील रस्ते सिमेंटचेच करण्याचा हट्ट धरतात आणि त्यासाठी पाण्याचा प्रचंड अपव्यय करण्यासही तयार होतात, तेव्हा त्यांना नागरिकांच्या नव्हे, तर स्वत:च्या हिताचीच काळजी जास्त असते, हे लक्षात येते. शहराला रोज गरजेपेक्षा दुपटीने अधिक पाणी मिळालेच पाहिजे, असे या नगरसेवकांचे म्हणणे असते, कारण त्यांना सिमेंटचे रस्ते करायचे असतात. त्या रस्त्यांवर पडणारे पावसाचे पाणी वाहून जाण्याची कोणतीही सोय करण्याची त्यांना गरज वाटत नाही. एकीकडे पर्जन्य जलपुनर्भरण (रेन वॉटर हार्वेस्टिंग) करण्याची सक्ती करायची आणि दुसरीकडे सिमेंटचे रस्ते करण्यासाठी शुद्ध केलेले पाणी प्रचंड प्रमाणात वापरायचे, हा शहाणपणा की निर्ढावलेपणा?

नगरसेवकांचा, रस्ते व्हायलाच हवे, हा हट्ट पुरा करण्यासाठी प्रशासनाने प्रक्रिया केलेले पाणी उपयोगात आणण्याच्या दिलेल्या सूचना हा तर मूर्खपणाचा कळसच. पालिकेचे मैलापाणी शुद्धिकरण प्रकल्प सुरू नाहीत, शिवाय तेथील प्रक्रिया केलेले पाणी रस्ते करण्यासाठी कसे पोहोचवता येईल, याची योजना नाही, तरीही डोळे झाकून नगरसेवकांची पाणी उधळपट्टीची मागणी मात्र तत्परतेने मान्य. लोकसत्ताच्या याच अंकात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार प्रक्रिया केलेले पाणी सिमेंटचे रस्ते बनवण्यासाठी वापरताच येऊ शकत नाही. हे माहीत असूनही नगरसेवकांच्या निर्लज्ज मागणीवर प्रशासन मूग गिळून गप्प बसते, याला काय म्हणायचे. पाण्याची गळती शोधण्याचे कष्ट कोणताही नगरसेवक करत नाही, पण पाण्याचा वारेमाप वापर करण्याच्या योजना पुऱ्या करण्यासाठी मात्र आग्रही राहणार, याला काय म्हणायचे?

आपलेच नशीब फुटके आणि पुण्याच्या पाण्यासारखे गळके. पण म्हणून केवळ आपले हितसंबंध राखणाऱ्या अशा सर्वपक्षीय नगरसेवकांना आपण पुन्हा पुन्हा निवडून देणार की काय? नागरिकांनी आपली सदसद्विवेकबुद्धी जागृत ठेवली नाही, तर आपल्या वाटय़ाला असेच नगरसेवक येणार, हे लक्षात ठेवायला हवे.