महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे ‘प्रश्न तुमचे उत्तर दाभोलकरांचे’ या डीव्हीडीचे प्रकाशन बुधवारी (१९ फेब्रुवारी) ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर आणि ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक अमोल पालेकर यांच्या हस्ते होणार आहे. एस. एम. जोशी सभागृह येथे सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमास शैला दाभोलकर आणि समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील उपस्थित राहणार आहेत.
दोन तासांच्या या डीव्हीडीमध्ये डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी श्रद्धा-अंधश्रद्धा, भूत-भानामती, जादूटोणा-फलज्योतिष, धर्म-अध्यात्म, विज्ञान-बुवाबाजी अशा विविध विषयांवर विचारण्यात आलेल्या २६ प्रश्नांना सविस्तर उत्तरे समाविष्ट आहेत. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीविषयी आणि कामासंदर्भात जनमानसात असलेले गैरसमज दूर करणारी आणि अनेक आक्षेपांचे निरसन करणारी ही दाभोलकरांची एकमेव डीव्हीडी आहे. या डीव्हीडीमध्ये शहाजी भोसले यांनी काही चमत्कारांचे सादरीकरण केले आहे. ८ एप्रिल २०१३ रोजी झालेल्या या कार्यक्रमाचे चित्रीकरण करण्यात आले होते. ‘मॅग्नम ओपस’ कंपनीचे संचालक गिरीश लाड यांनी या डीव्हीडीची निर्मिती केली असून ‘साधना’चे संपादक विनोद शिरसाठ यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना प्रश्न विचारले आहेत. या डीव्हीडीसोबत डॉ. दाभोलकरांच्या दहा भाषणांचा समावेश असलेली सीडी मोफत दिली जाणार आहे.

Story img Loader