पुणे : शहरातील पदपथ विविध प्रकारच्या अतिक्रमणांच्या विळख्यात अडकले असतानाच प्रस्तावित ई-बाईक योजनेसाठी आवश्यक असलेली चार्जिंक स्थानके पदपथांवरच उभारण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पदपथांवरून विना अडथळा चालणे पादचाऱ्यांसाठी अडचणीचे ठरणार आहे. विशेष म्हणजे बंद पडलेल्या भाडेतत्त्वावरील सायकल मार्ग योजनेअंतर्गत अडीचशे ठिकाणी चार्जिंग स्टेशन्स उभारण्याचे नियोजित आहे.
शहरात भाडेतत्त्वावर ई-बाईक योजना सुरू करण्याला महापालिकेने मान्यता दिली आहे. ई-बाईक सेवेसाठी पुढील सहा महिन्यांत आवश्यक त्या पायाभूत सुविधा महापालिकेकडून निर्माण केल्या जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात अडीचशे ठिकाणी चार्जिंग स्टेशन्स प्रस्तावित करण्यात आली आहेत. चार्जिंग स्टेशनच्या जागा पुढील ३० वर्षांसाठी देण्याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडून तयार करण्यात आला होता. पहिल्या टप्प्यात ७८० जागांपैकी ५०० जागा कंपनीला द्याव्यात, त्यापैकी २५० ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्याचे निश्चित करण्यात आले आहे. मात्र या सर्व जागा पदपथांवर आणि रस्त्याच्या कडेलाच ठेवण्यात आल्या आहेत.
शहरातील पदपथांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. लहान-मोठे फेरीवाले, विक्रेत्यांनी पदपथ अडविले आहेत. त्यामुळे पदपथांवरून विना अडथळा मार्गक्रमण करणे पादचाऱ्यांसाठी अडचणीचे ठरत आहे. त्यात आता ई-बाईकची चार्जिंग स्टेशन्स आणि ई-बाईक पार्किंगची भर पडणार आहे.महापालिकेने काही वर्षांपूर्वी भाडेकराराने सायकल योजना सुरू केली. या योजनेसाठी पदपथांवर सायकल पार्किंग सुरू करण्यात आले. शहराच्या अनेक भागांतील पदपथांवर सायकली ठेवण्यात आल्या.
सायकल ठेवण्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. सध्या ही योजना बंद पडली आहे. त्यामुळे सायकल योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या पायाभूत सुविधा ई-बाईक योजनेसाठी वापरण्याचे नियोजित आहे.भाडेतत्त्वावरील सायकल योजनेच्या ठिकाणांची यादी महापालिकेच्या पथ विभागाकडून ई-बाईक सेवा पुरविणाऱ्या खासगी कंपनीला देण्यात आली आहे. ई-बाईकचे पार्किंग हे पदपथांवर असल्याने पदपथांवर किंवा रस्त्याच्या कडेला चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात येणार आहेत.