अन्न व औषध प्रशासनाने निकोटिनयुक्त ई-सिगारेटवर बंदी घातल्यानंतरही या सिगारेट्सची ऑनलाइन विक्री सर्रास सुरूच आहे. शहरात लष्कर भाग आणि कल्याणीनगरमध्ये ई-सिगारेट्सना विशेष मागणी आहे. ऑनलाइन विक्रीचे हे जाळे शोधून काढणे आणि त्यातून नेमक्या निकोटिनयुक्त ई-सिगारेटवर कारवाई करणे जिकिरीचे असल्यामुळे ‘ई-सिगारेट्सवर बंदी लागू; पण कारवाईचे काय,’ असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० अनुसार निकोटिनयुक्त ई-सिगारेटवर राज्यात बंदी घालण्यात आली असून मुंबईच्या अन्न व औषध प्रशासनातर्फे राज्यभरातील औषध विभाग कार्यालयांना त्यांच्या कार्यक्षेत्रात या सिगारेटची विक्री होऊ नये यासाठी कारवाई करण्यास सांगणारे पत्र पाठवण्यात आले आहे. याबाबत विचारले असता, ‘निकोटिनयुक्त ई-सिगारेटची विक्री होत असल्याचे आढळून आल्यास कारवाई करू,’ असे पुण्याच्या औषध विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र ही सिगारेट निकोटिन विरहित आणि निकोटिनयुक्त अशा दोन्ही प्रकारात आणि प्रामुख्याने ऑनलाइन शॉपिंगद्वारे उपलब्ध होत असल्यामुळे नेमकी निकोटिनयुक्त सिगारेट शोधणे आणि त्यावर कारवाई करणे हे मोठे आव्हान ठरणार आहे.
ऑनलाइन शॉपिंगद्वारे ई-सिगारेट घरच्या घरी मागवणे खूप सोपे आहे. या सिगारेटचे उत्पादन करणारे भारतातील लोकप्रिय ब्रँड्स नॉयडा (उत्तर प्रदेश), हैदराबाद, नवी दिल्ली येथील आहेत. या कंपन्यांच्या संकेतस्थळांबरोबरच शॉपिंग वेबसाइट्सवरही त्यांची विक्री केली जाते. निकोटिनयुक्त ई-सिगारेट्स तंबाखू, मार्लबोरो अशा ६ वेगवेगळ्या स्वादांमध्ये मिळतात. या सिगारेटमधील निकोटिनचे प्रमाण ब्रँडनुसार वेगळे असल्याचे दिसून येते. काही कंपन्यांच्या सिगारेट्समध्ये १२ एमजी निकोटिन आढळते, तर काहींमध्ये हे प्रमाण १६ ते १८ एमजी इतके आहे.      
पुणे पान असोसिएशनचे अध्यक्ष शरद मोरे म्हणाले, ‘‘लष्कर भाग आणि कल्याणीनगरमध्ये ई-सिगारेट्स लोकप्रिय आहेत पण त्यात निकोटिनयुक्त ई-सिगारेटच्या वापराचे प्रमाण कमी आहे. नेहमीच्या सिगारेटमध्येही निकोटिनचे प्रमाण खूप असते. धूम्रपान शंभर टक्के अपायकारकच असल्याचे सिद्ध होऊनही पूर्णपणे धूम्रपानावरच बंदी का घातली जात नाही?’’
काय आहे ई-सिगारेट?
सिगारेटसारखा धूर न होणारी सिगारेट म्हणजे ‘ई-सिगारेट’ (इलेक्ट्रॉनिक सिगारेट). या सिगारेटमध्ये तंबाखूऐवजी द्रवरूपातील निकोटिनचा समावेश असतो. ही सिगारेट पेटवण्यासाठी लायटर किंवा काडेपेटी लागत नाही. त्याच्याऐवजी सिगारेटमध्ये एक लहान बॅटरी असते. त्याच्या साहाय्याने द्रवरूप निकोटिनला उष्णता दिली जाते. सिगारेट ओढताना तापलेल्या निकोटिनची वाफ ओढली जाते. या वाफेला वास नसतो.
ई-सिगारेटवर बंदी का?
‘निकोटिन पोलरक्रिलेक्स’ या घटकद्रव्यांचे २ एलजी आणि ४ एमजी असे प्रमाण असलेल्या स्वादिष्ट गोळ्या (लॉझेंज) किंवा च्युइंग गमला औषध नियंत्रकांनी मान्यता दिली आहे. मात्र निकोटिन घटकद्रव्य असलेल्या सिगारेटला औषध नियंत्रकांची मान्यता नाही. औषध विभागाला मिळालेल्या पत्रात नमूद केल्यानुसार, ‘‘औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्याच्या नियम १२२ (ई) अनुसार निकोटिन हे घटकद्रव्य असलेली ई-सिगारेट ही नवीन औषध समजली जात असून त्याला औषध नियंत्रकांची परवानगी आवश्यक आहे. त्यामुळे हे उत्पादन या कायद्याचे उल्लंघन करत असल्याचे स्पष्ट होत असून त्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.’’ 

Story img Loader