केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळच्या शाळांमध्ये (सीबीएसई) आता पहिली ते दहावीपर्यंत ई-लìनग सुरू करण्यात येणार असून त्यासाठी खासगी कंपन्यांच्या माध्यमातून सीबीएसईने अभ्याससाहित्य तयार केले आहे. मात्र, सीबीएसईच्या या नव्या उपक्रमामुळे शाळांच्या शुल्क पावतीतील एक रकाना आणखी वाढणार आहे.
सीसीई पद्धतीनुसार आवश्यक असलेले अभ्यास साहित्य ऑनलाइन उपलब्ध करून द्यावे अशा सूचना सीबीएसईने सर्व शाळांना केल्या आहेत. मात्र, ज्या शाळांना ई-लर्निगची ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देणे शक्य नसेल, त्या शाळांना ऑफलाइन सामग्रीचाही पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. ऑफलाइन साहित्य वापरू इच्छिणाऱ्या शाळांना हे साहित्य पेनड्राइव्हमध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहे. शासकीय आणि अनुदानप्राप्त शाळांना हे अभ्यास साहित्य नि:शुल्क उपलब्ध होणार असले, तरी खासगी शाळांना मात्र हे साहित्य विकत घ्यावे लागणार आहे. खासगी शाळांना इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतचे ऑनलाइन मटेरियल खरेदी करण्यासाठी १२ हजार ५०० रुपये, तर ऑफलाइन मटेरियलसाठी १८ हजार ५०० रुपये खर्च करावे लागणार आहेत. इयत्ता सहावी ते आठवीच्या ऑनलाइन अभ्यास साहित्यासाठी ७ हजार ५०० तर ऑफलाइन साहित्यासाठी ११ हजार २५० रुपये खर्च करावे लागणार आहेत. नववी आणि दहावीच्या ऑनलाइन अभ्यास साहित्यासाठी २० हजार रुपये आणि ऑफलाइन साहित्यासाठी २३ हजार ५०० रुपये खर्च करावे लागणार आहेत. या साहित्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांकडून १५० ते २०० रुपये शुल्क आकारण्याची मुभा शाळांना देण्यात आली आहे.
अभ्यासक्रमाची सत्रानुसार रचना करण्यात आली असून अभ्यास साहित्यामध्ये इंग्रजी, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र आणि हिंदीतील पत्रलेखन आदींचा समावेश असेल. विषयाचे स्पष्टीकरण आणि विविध प्रश्नांचे पर्यायही यामध्ये उपलब्ध आहेत. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची एक हजार प्रश्नांपर्यंत एक प्रश्न संच तयार होणार आहे. रिकाम्या जागा, बहुपर्यायी प्रश्न, प्रश्नमंजूषा, प्रकल्प, प्रात्यक्षिक, शब्दकोडे अशा विविध प्रकारांचा यामध्ये समावेश करण्यात येणार आहे. 

Story img Loader