सोशल मीडियाचा गैरवापर केल्यास कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे सांगत पुण्याचे पोलीस आयुक्त सतीश माथूर यांनी फेसबुक आणि व्हॉट्स अॅपसंदर्भात जनजागृतीसाठी नवीन प्रयोग करणार असल्याचे पिंपरीत पत्रकारांशी बोलताना सांगितले. शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘ई-शपथ’ तयार करण्यात आली असून वर्ग सुरू होण्यापूर्वी प्राचार्य, तसेच मुख्याध्यापक विद्यार्थ्यांकडून ही शपथ म्हणवून घेणार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांतील घडामोडी व आगामी सणासुदीचे वातावरण लक्षात घेऊन पोलीस आयुक्तांनी परिमंडल तीनच्या अधिकाऱ्यांसमवेत गुरूवारी आढावा बैठक घेतली, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. बैठकीस पोलीस उपायुक्त राजेंद्र माने व सर्व ठाण्यांचे पोलीस निरीक्षक उपस्थित होते. तत्पूर्वी, खासदार श्रीरंग बारणे यांनी माथूर यांची भेट घेतली. शहरातील वाढत्या गुन्हेगारीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी त्यांनी केली, तेव्हा योग्य कार्यवाहीचे आश्वासन त्यांनी बारणेंना दिले.
माथूर म्हणाले,की पालखी, गणपती, रमजान एकापोठ येत असल्याने सुरक्षा यंत्रणेविषयी आढावा घेतला. कामात सुसूत्रता असावी, सुरक्षिततेचे वातावरण असावे, यादृष्टीने आवश्यक सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. सोशल मीडियाचा गैरवापर होत असल्याचे निदर्शनास आल्याने जनजागृती करण्यावर भर दिला जाणार असून शाळा-महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना ‘ई-शपथ’ देण्याचा प्रयोग करण्यात येणार आहेत. पिंपरीसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय असावे, असे तूर्त वाटत नाही. अंतर्गत पथके, तसेच वाढवलेले मनुष्यबळ लक्षात घेता येथील परिस्थितीत सुधारणा होईल. दिघी व वाकड येथे नवीन पोलीस ठाणी होत आहेत. परिमंडल तीनमध्ये गरजनेनुसार पुनर्रचना करू आणि वेळप्रसंगी प्रतिबंधात्मक उपाययोजना करू, असे ते म्हणाले. हिंदू राष्ट्र सेनेवर बंदीविषयीचा निर्णय केंद्र सरकार घेईल, तो आपला अधिकार नाही, असे ते म्हणाले.
फेसबुक, व्हॉट्स अॅपचा गैरवापर टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना ‘ई-शपथ’
शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘ई-शपथ’ तयार करण्यात आली असून वर्ग सुरू होण्यापूर्वी प्राचार्य, तसेच मुख्याध्यापक विद्यार्थ्यांकडून ही शपथ म्हणवून घेणार आहे.
First published on: 20-06-2014 at 03:25 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: E shapath police commissioner satish mathur facebook whatsapp