पीएमपीमधील ई-तिकिटींग यंत्रणेचा पूर्ण बोजवारा उडाला असून किमान सातशे यंत्र सध्या बंद आहेत. या यंत्रणेत संबंधित ठेकेदार कंपनीचा मोठा फायदा होत असून पीएमपीचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान सातत्याने सुरू आहे. त्यामुळे अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमतातूनच हा प्रकार सुरू असल्याची शंका पीएमपी प्रवासी मंचने घेतली आहे.
पीएमपीमध्ये २००६-०७ साली दोन आगारांमध्ये ई-तिकिटींग यंत्रणा सुरू झाली. संबंधित ठेकेदाराचा अतिशय वाईट अनुभव, भ्रष्ट कारभार, यंत्रांमध्ये सातत्याने बिघाड, बनावट यंत्र वापरात येणे असे प्रकार सर्रास झाल्यानंतरही त्याच ठेकेदाराला ई-तिकिटींगसाठी आणखी अकरा आगारांचे काम देण्यात आले. निकृष्ट सेवा आणि घोटाळ्यांचे अनेक विक्रम ठेकेदाराने केले आहेत, अशा तक्रारीचे निवेदन पीएमपी प्रवासी मंचचे जुगल राठी आणि विवेक वेलणकर यांनी आयुक्तांना दिले आहे.
सद्यपरिस्थितीत सात-आठशे यंत्र बंद आहेत वा उपलब्ध नाहीत. निम्म्याहून अधिक वाहक अद्यापही तिकिटांचा ट्रे वापरतात. ई-तिकिटींगची जी यंत्रं वापरात आहेत ती मार्गावरच नादुरुस्त होण्याचे वा त्यांना आग लागण्याचेही प्रकार वारंवार घडतात. ग्रुप तिकिटांमध्ये ठेकेदाराचा मोठा फायदा होत असून पीएमपीला कोटय़वधींचा फटका बसत आहे. या आणि अशा सर्व गैरप्रकारांबाबत प्रशासन आणि व्यवस्थापनाकडून कोणतीही कठोर, प्रभावी कारवाई का होत नाही, तसेच नुकसानीची वसुली का केली जात नाही, असा प्रश्न राठी यांनी या निवेदनातून उपस्थित केला आहे.
ई-तिकिटिंग यंत्रणेतील या घोटाळ्याला नक्की कोण जबाबदार आहे आणि अटी-शर्तीचा भंग होऊन तसेच पीएमपीला कोटय़वधीचा गंडा बसल्यानंतर तसेच प्रवाशांचे हाल होतानाही ठेकेदारावर मात्र कारवाई केली जात नाही, याचा अर्थ प्रशासनातील अधिकारी यात सामील आहेत का अशी शंका येते, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सदोष गाडय़ांच्या खरेदीची चौकशी करा
कारची धडक लागून पीएमपीची गाडी पेटण्याचा जो प्रकार शुक्रवारी घडला, त्या अनुषंगाने त्या ताफ्यातील सर्वच गाडय़ांच्या खरेदीची चौकशी झाली पाहिजे, अशीही मागणी पीएमपी प्रवासी मंचने केली आहे. सर्व गुलाबी/पांढऱ्या सीएनजी गाडय़ांना मागील बाजूस तकलादू, निकृष्ट क्रॅश बंपर्स बसवण्यात आले आहेत. त्यामुळे किरकोळ धक्क्यानेही ते तुटले आहेत. शिवाय आणखी दोनशे गाडया बिना बंपर्सच्या आहेत. मोटार वाहन कायद्यानुसार प्रत्येक प्रवासी वाहनाला दणकट क्रॅश बंपर आवश्यक असताना पीएमपीच्या नव्या गाडय़ांना ते नाहीत, या मागे नेमके काय कारस्थान आहे, अशीही विचारणा संघटनेने केली असून या सदोष गाडय़ांच्या खरेदीची चौकशी करावी आणि दणकट क्रॅश बंपर नसलेल्या गाडय़ा मार्गावर आणू नयेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा