पुणे : पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलवर भूकंप झाल्याची घोषणा सुरू होते. विमानतळावरील कर्मचारी तातडीने धावपळ करून प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवू लागतात. त्याचवेळी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक आणि राज्य आपत्ती निवारण पथकेही तिथे दाखल होऊन प्रवाशांची सुटका करण्याची मोहीम हाती घेतात. अखेर ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर हे केवळ एक प्रात्यक्षिक असल्याचे जाहीर केले जाते. त्यामुळे सर्वच प्रवाशांचा जीव भांड्यात पडतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भूंकप आल्यास प्रवाशांना पुणे विमानतळातून सुखरुप बाहेर काढण्यासाठी दरवर्षी प्रात्यक्षिक घेतले जाते. यंदा हे प्रात्यक्षिक विमानतळाच्या नवीन टर्मिनलवर घेण्यात आले. त्यातून विमानतळावरील आपत्ती व्यवस्थापन क्षमतांची तपासणी करण्यासोबत त्यांची सक्षमताही तपासण्यात आली. विमानतळावर भूकंप झाल्याची घोषणा सर्वप्रथम करण्यात आली. त्यावेळी विमानतळावरील कर्मचाऱ्यांसह सुरक्षा दलांनी धावाधाव सुरू झाली. सर्वप्रथम प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. सर्व यंत्रणांशी समन्वय साधून कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी हलविले.

हेही वाचा >>>पुणे : नवरात्रोत्सवापूर्वी चतु:शृंगी मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम पूर्णत्वास,मंदिर रविवारपासून भाविकांना दर्शनासाठी खुले

या प्रात्यक्षिकावेळी आरोग्य विभागाचे पथकही आपत्कालीन उपचारासाठी तैनात होते. प्रवाशांवर प्रथमोपचारासह इतर उपचार करण्याची या पथकाची सज्जताही तपासण्यात आली. या प्रात्यक्षिकामध्ये भारतीय विमानतळ प्राधिकरण, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ), राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (एनडीआरएफ), पुणे महापालिका, अग्निशमन दल, राज्य आपत्ती निवारण पथक (एसडीआरएफ), स्थानिक पोलीस, वाहतूक पोलीस आणि आरोग्य विभाग या सर्व यंत्रणा सहभागी झाल्या होत्या. सर्वांनी एकत्रितरित्या हे प्रात्यक्षिक यशस्वीपणे पूर्ण केले.

हेही वाचा >>>पिंपरी- चिंचवड: भोसरी मतदारसंघ तुतारीला? शिवसेना ठाकरे गटाने घेतला हा मोठा निर्णय

पुणे विमानतळावर आपत्कालीन प्रसंगी असलेली सुरक्षा सज्जता या प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून तपासण्यात आली. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत पुणे विमानतळाची असलेली कटिबद्धता यातून अधोरेखित करण्यात आली. भविष्यात एखादी आपत्ती आल्यास सर्व यंत्रणा योग्य समन्वय साधून उपाययोजना करू शकतात, हे यातून सिद्ध झाले. याचबरोबर भविष्यात कोणत्या सुधारणा कराव्या लागतील, हेही यातून समोर आले.- संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Earthquake safety mock operation at pune airport by national disaster response team and state disaster response team pune print news stj 05 amy