फार मोठी कुलमहती असणारा गुलाब घरी आणण्याचा संकल्प आपण नवीन वर्षांच्या सुरुवातीस केला आहे. आपल्या बागेचा सदस्य होणाऱ्या या सम्राटाच्या स्वागताची शाही तयारी हवी. सहा ते आठ तास उन्हाची जागा हवी. कुंडीत लावायचा झाल्यास चांगली भारदस्त निदान एक फूटभर व्यासाची आणि तेवढीच खोल कुंडी हवी. जमिनीत लावायचा झाल्यास दीड फूट लांब, दीड फूट रुंद आणि दीड फूट खोल खड्डा हवा. गुलाबासाठी सेंद्रिय माती वापरताना त्यामध्ये कोकोपीथ आणि नीमपेंड घालून कुंडी किंवा खड्डा भरून ठेवावा. आपल्या आवडीच्या रंगाचा हायब्रीड हीज वा फ्लोरिबंडा गुलाबाचे रोप आणता येईल. नामांकित रोपवाटिकेतूनच रोपं आणावीत. रोपं आणल्यावर आठ-दहा दिवस जेथे रोप लावायचे त्या जागी ठेवून पाणी घालावे. रोपास नवीन जागेची सवय झाली की रोपाची पिशवी अलगद कापावी. मुळातली घट्ट माती मोकळी करावी आणि शक्यतो सायंकाळी रोपाची लागवड करावी. रोप लावल्यावर त्यास पाणी द्यावे. गुलाबास खूप पाणी आवडत नाही, पण सदैव ओल लागते. त्यामुळेच मातीत कोकोपीथ जरूर घालावे. रोपास नवी फुटं यायला लागली की शेणखत, स्टेरामील, बोनमील अथवा कंपोस्ट यापकी एकाचा हलका डोस द्यावा. प्राणिजन्य खत गुलाबास आवडते. पहिली कळी आल्यावर दुसरा डोस द्यावा, ज्यामुळे फुलाचा तजेला वाढेल. खत घातल्यावर कुंडीत किंवा रोपाच्या आजूबाजूला तण येणार नाही याची काळजी घ्यावी. नाहीतर तणच फोफावेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा