पुणे : दिवाळीच्या काळात मिठाईची रेलचेल असल्याने ती खाण्याचे प्रमाण वाढते. मिठाई खाण्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढण्यासोबत रक्तदाबामध्ये वाढ होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे मधुमेह आणि हृदयविकार असलेल्या रुग्णांमध्ये तीव्र धोका निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर दिवाळीच्या काळात मिठाई खाताना काळजी घेण्याचा सल्ला आरोग्यतज्ज्ञांनी दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिवाळीच्या काळात रक्तातील साखरेची पातळी वाढण्याची काही कारणे आहेत. या काळात दिवाळी फराळासह मिठाईचे सेवन मोठ्या प्रमाणात केले जाते. सणासुदीचा काळ असल्याने तोंड गोड करण्याच्या नावाखाली मिठाई खाताना हात आखडता घेतला जात नाही. मिठाई आणि तळलेले पदार्थ रक्तातील साखर वाढविण्यास कारणीभूत ठरतात. याचबरोबर दिवाळीच्या काळात सुटी असल्याने शारीरिक हालचाल मंदावलेली असते. मिठाईचे अतिसेवन आणि कमी हालचाल यामुळे रक्तदाबात वाढ होते.

हेही वाचा >>> ‘टीईटी’चे प्रवेशपत्र उपलब्ध; कधीपर्यंत डाऊनलोड करता येणार?

दिवाळीच्या काळात मधुमेह आणि हृदयविकार असलेल्या रुग्णांना असलेला धोका आणखी वाढतो. त्यामुळे त्यांनी विशेष काळजी घ्यायला हवी. याबाबत आरोग्यतज्ज्ञ डॉ. पूनम शहा म्हणाल्या, की मधुमेहपूर्व आणि मधुमेह असलेल्या अशा दोन्ही प्रकारच्या व्यक्तींना प्रतिबंधात्मक काळजी घेणे गरजेचे आहे. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित कशी ठेवता येईल, याचा त्यांनी प्रयत्न करावा. मिठाई खाताना ती कमी प्रमाणात खावी. मिठाईसोबत प्रथिनयुक्त पदार्थ खावेत. यामुळे आहार संतुलित होऊन साखरेची पातळी फार वाढत नाही.

हेही वाचा >>> बीबीए, बीसीए अभ्यासक्रमांच्या जागा रिक्त… नेमके काय झाले?

दिवाळीच्या काळात सुटी असल्याने शारीरिक हालचाली कमी होतात. त्यामुळे व्यायाम करण्यावर भर द्यायला हवा. रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही. त्यामुळे ती वाढू नये यासाठी प्रयत्न करावेत. मिठाईसह तळलेले पदार्थ खाल्ल्यानंतर व्यायाम टाळू नये. याचबरोबर आता शुगर फ्री मिठाईचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. केवळ शुगर फ्री आहेत, म्हणून ते जास्त प्रमाणात खाऊ नयेत. त्याचेही दुष्परिणाम आरोग्यावर होऊ शकतात, असे डॉ. शहा यांनी नमूद केले.

काळजी काय घ्यावी?

– रक्तातील साखरेची पातळी वेळोवेळी तपासा.

– रक्तदाब नियमितपणे तपासा.

– मिठाईचे सेवन कमी प्रमाणात करा.

– जास्त उष्मांक असलेले तळलेले पदार्थ टाळा.

– शारीरिक हालचाल, व्यायामावर भर द्या.

– शुगर फ्री मिठाईचेही अतिसेवन टाळा.

– दिवसभरात भरपूर पाणी प्या.

– चहा, कॉफी, मद्यपान टाळावे. – पालेभाज्यांचा आहारात जास्तीत जास्त समावेश करा.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eating sweets likely to increase blood sugar levels and blood pressure pune print news stj 05 zws