‘इबोला’ रोगाचे रुग्ण ओळखण्यासाठी विमानतळांवर आता आणखी कडक यंत्रणा उभारण्यात आली असून लोहगावच्या विमानतळावर माणसाच्या शरीरात ताप आहे का, हे चटकन ओळखणारा ‘थर्मल स्कॅनर’ बसवण्यात आला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या सहसंचालक डॉ. कांचन जगताप यांनी ही माहिती दिली. सध्या राज्यात इबोलाचा एकही रुग्ण किंवा संशयित रुग्ण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अशा प्रकारचा थर्मल स्कॅनर यापूर्वी केवळ मुंबई विमानतळावर होता. दोन आठवडय़ांपूर्वी तो पुणे आणि नागपूरच्या विमानतळांवरही बसवण्यात आल्याचे डॉ. जगताप यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, ‘‘उच्च न्यायालयात एका जनहित याचिकेवर निर्णय देताना अशा प्रकारचे स्कॅनर विमानतळांवर लावण्याचे आदेश आरोग्य खात्याला देण्यात आले होते. यापूर्वी लोहगाव विमानतळावर डिजिटल थर्मामीटर वापरून इबोलाचा धोका असलेल्या देशांमधून आलेल्या व्यक्तींना तापसदृश लक्षणे दिसतात का हे तपासले जात असे. आता ते काम थर्मल स्कॅनर करत आहे. याशिवाय अशा प्रवाशांच्या तपासणीसाठी विमानतळावर डॉक्टरांची पथकेही नेमण्यात आली आहेत.’’
गिनिया, लायबेरिया, नायजेरिया आणि सिएरा लिओन या पश्चिम आफ्रिकेतील देशांमध्ये ‘इबोला’ रोग प्रामुख्याने आढळतो. ताप, डोकेदुखी, स्नायू, पोट आणि सांध्यांचे दुखणे, घशात खवखव, अशक्तपणा, काळे व रक्ताचे जुलाब, रक्ताच्या उलटय़ा, नाक व हिरडय़ांमधून रक्तस्राव, श्वास घेण्यास अडचण ही लक्षणे या रोगात दिसून येतात. ‘इबोलाचा धोका असलेल्या देशांमधून आलेल्या ५ जणांना इबोलासदृश लक्षणे दिसली होती. मात्र राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेमार्फत त्यांची तपासणी केली असता त्यांना इबोला झाला नसल्याचे स्पष्ट झाले. सध्या पुण्यात किंवा राज्यात इबोलाचा एकही रुग्ण नाही,’ असेही डॉ. जगताप यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा