‘इबोला’ रोगाने पुण्यात पाऊल ठेवले असल्याच्या अफवा सोशल माध्यमांवर अजूनही कायम आहेत. प्रत्यक्षात अजून पुण्यात ‘इबोला’चा एकही संशयित रुग्ण आढळला नसल्याचे पालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. एस. टी. परदेशी यांनी स्पष्ट केले आहे.  
सर्वप्रथम गुरुवारी व्हॉट्सअ‍ॅपवर इबोलाचा रुग्ण सापडल्याची अफवा उठली होती. आपल्याला आलेला इबोलासंबंधीचा मेसेज इतरांना पाठवण्याची तातडी दाखवली गेल्यामुळे अनेक जण गोंधळून गेले होते. गुरुवारी लोहगाव विमानतळावर उतरलेल्या एका प्रवाशाच्या पारपत्रावरून तो आफ्रिकेतील ‘गिनिया’ देशात राहून आल्याचे कळले होते. या प्रवाशाला इबोलाची कोणतीही लक्षणे दिसत नव्हती. तरीही नायडू संसर्गजन्य रोगांच्या रुग्णालयात त्याची तपासणी करून आजार नसल्यामुळे त्याला घरी सोडण्यात आले. या घटनेनंतर लगेच ‘‘इबोला’चा रुग्ण पुण्यात सापडला’ असे मेसेज व्हॉट्सअ‍ॅपवर फिरू लागले. अजूनही या प्रकारचे मेसेज व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकवर फिरतच आहेत. या पाश्र्वभूमीवर नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून घाबरून जाऊ नये, असे आवाहन डॉ. परदेशी यांनी केले आहे. अद्याप इबोला रोगाचा एकही रुग्ण पुण्यात आढळला नसून सोशल माध्यमांवर असे मेसेज आल्यास ते नागरिकांनी ‘फॉरवर्ड’ करू नयेत, असेही डॉ. परदेशी यांनी सांगितले.        
इबोला हा रोग हवेवाटे पसरत नाही. सध्या या रोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने पश्चिम आफ्रिकेतील गिनिया, लायबेरिया, नायजेरिया आणि सिएरा लिओन या देशांत असून इबोलाग्रस्त रुग्णाचे रक्त, वीर्य किंवा शरीरातून बाहेर टाकल्या जाणाऱ्या द्रव्यांशी संपर्क आला तरच निरोगी व्यक्तीला इबोला रोग होण्याची शक्यता असते. ताप, डोकेदुखी, स्नायू, पोट आणि सांधे दुखणे, घशात खवखवणे, अशक्तपणा येणे, काळ्या रंगाचे व रक्ताचे जुलाब होणे, रक्ताची उलटी होणे, नाक व हिरडय़ांमधून रक्त येणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे इबोला रोगात दिसू शकतात.

Story img Loader