पुरंदर तालुक्यातील सासवड येथील तहसीलदार कार्यालयातून मतदान यंत्र (कंट्रोल युनिट) चोरीला गेल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली होती. ही घटना ५ फेब्रुवारीला उजे़डात आली होती. या घटनेची भारत निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली होती. निवडणूक कामातील हलगर्जीपणा प्रशासनातील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना चांगलाच भोवला असून महसूल आणि गृह विभागाकडून याबाबतचे दोन आदेश प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
हेही वाचा >>> पिंपरी: ‘इको पार्क’मधील वृक्षतोडीच्या निषेधार्थ पर्यावरणप्रेमींचे मुंडन आंदोलन
या प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाने पुरंदरचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांना तात्काळ निलंबित करावे. तसेच या अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्याचे आदेश राज्याच्या मुख्य सचिवांना दिले होते. त्यानुसार राज्य शासनाच्या महसूल विभागाने पुरंदरच्या प्रांताधिकारी वर्षा लांडगे, तहसिलदार विक्रम रजपूत यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. याबाबतचे आदेश महसूल विभागाचे अवर सचिव संजीव राणे यांनी प्रसृत केले.
हेही वाचा >>> प्रकाश आंबेडकरांना जेव्हा राग येतो…
निलंबन कालावधीत हे दोन्ही अधिकाऱ्यांनी पुणे जिल्हाधिकारी यांच्या पूर्व संमतीशिवाय मुख्यालय सोडता कामा नये, निलंबन कालावधीत खासगी नोकरी स्वीकारु नये, त्यांनी तसे केल्यास ते दोषारोपास पात्र ठरतील आणि त्या अनुषंगने त्यांच्याविरुध्द कारवाई करण्यात येणार असल्याचे शासनाने आदेशात नमूद केले आहे. याशिवाय पुरंदर-भोरचे उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांना निलंबित करण्याचे आदेश गृह विभागाचे उपसचिव चेतन निकम यांनी प्रसृत केला. बरडे हे शासकीय सेवेतील वर्ग एकचे अधिकारी असून त्यांना कायद्याचे ज्ञान असूनही त्यांनी निवडणुकीच्या महत्त्वाच्या कामात कर्तव्यात कसूर केल्याचे निलंबन आदेशात म्हटले आहे.