प्लास्टिकच्या ब्रशने दात घासण्यापासून मुक्ती देणारा बांबूचा टूथब्रश अवघ्या शंभर रुपयांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा टूथब्रश तुम्हाला ‘इको बझार’मध्ये बांबू इंडिया संस्थेच्या दालनामध्ये मिळू शकेल. शिवाय बांबूचा पेन, नोटपॅड, फळे आणि भाज्या चिरण्याची लाकडी फळी, कलमदान अशा नावीन्यपूर्ण वस्तूही येथे पाहायला मिळत आहेत.

‘प्लास्टिकला नकार, पृथ्वीला होकार ’ही मध्यवर्ती संकल्पना घेऊन किलरेस्कर आणि क्लब वसुंधरातर्फे आयोजित १३ व्या किलरेस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त विविध पर्यावरणपूरक वस्तूंचा खजिना ‘इको बझार’च्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आला आहे.

घोले रस्त्यावरील पं. जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे भरविण्यात आलेला इको बझार रविवारी (६ जानेवारी) सकाळी अकरा ते रात्री आठ या वेळेत पुणेकरांसाठी खुला राहणार आहे. पर्यावरणस्नेही उत्पादने, वस्तू आणि सेवांचे पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या वेगवेगळ्या संस्थांना एकाच छताखाली आणून येथे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. सेंद्रिय खाद्यपदाथार्ंचा आस्वाद हे यंदाच्या इको बझारचे आगळेवेगळे वैशिष्टय़ ठरले आहे. या प्रदर्शनामध्ये प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळण्यात आला आहे.

प्रदर्शनातील बांबूची आरामदायी खुर्ची, बांबूचे दिवे लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. बांबूचा सांगाडा असलेली सायकल आणि एकाचवेळी दोन जण चालवू शकतील अशी टँडम बायसिकलही आकर्षणाचे केंद्र ठरली आहे. दिसायला सुंदर आणि वजनाला हलक्या असलेल्या या सायकलला परदेशातून मागणी असते.

आतापर्यंत चार सायकली परदेशी पाठविण्यात आल्या आहेत, असे या सायकलचे निर्माते कॅप्टन (निवृत्त) शशिशेखर पाठक यांनी सांगितले. भोरजवळील डेरेगाव येथील आमच्या शेतातील बांबूपासून आकर्षक रचना असलेल्या कुंडय़ांची निर्मिती करण्यात आली आहे. प्लास्टिकच्या कुंडय़ांना पर्याय म्हणून लोक या कुंडय़ांची खरेदी करीत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

खास देशी कलाकुसरीच्या वस्तू, बांबूचे टूथब्रश, पेन, कलमदान (पेन स्टँड), बांबूच्या कुंडय़ा, बांबूचा सांगाडा असलेली सायकल यांसह सेंद्रिय पद्धतीने पिकविलेले धान्य आणि वैविध्यपूर्ण लोणची अशा उत्पादनांनी सज्ज असलेल्या ‘इको बझार’ला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.

पर्यावरणपूरक जीवनशैलीला चालना देणाऱ्या इको बझारला भेट देत नववर्षांची खरेदी करण्याकडे कल दिसून येत आहे.

महाराष्ट्रातील बांबू, केळीची खुंटे, इम्फाळमधील कॉनाग्रास, आसाममधील केन, पश्चिम बंगालमधील सबाई, तमिळनाडूमधील ताडी पाम यापासून बनविलेल्या दैनंदिन जीवनातील नावीन्यपूर्ण वस्तू आणि दर्भाच्या काडय़ांपासून बनविण्यात आलेली चटई (योगा मॅट) इको बझारमध्ये खरेदी करण्याची सुविधा आहे. ‘बाएफ’ संस्थेच्या दालनात सेंद्रिय पद्धतीने पिकविण्यात आलेला खपली गहू, तूर डाळ, मूग डाळ, हातसडीचा तांदूळ, इंद्रायणी, ब्राऊन राईस, आंबेमोहोर, रायभोग, कळभात, वलय रेड राईस, वलय स्टिम राईस, इंद्रायणी या उत्पादनांसह उंबर, मिरची, आवळा, ओली हळद, कैरी, िलबू अशी वैविध्यपूर्ण लोणची खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.

Story img Loader