कोल्हापूर, पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानांबरोबरच पुण्यातील मालमत्तांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी छापे टाकले. या कारवाईवरून पुन्हा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत.
‘ईडी’ची पथके बुधवारी सकाळीच मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानासह पुण्यातील कोरेगाव पार्क आणि बंडगार्डन येथील मालमत्तांस्थळी दाखल झाली. कागलच्या निवासस्थानातून मोठय़ा प्रमाणात कागदपत्रे जप्त करण्यात आली. ही कारवाई दिवसभर सुरू होती. याबाबत अधिकाऱ्यांनी भाष्य करण्यास नकार दिला. घराबाहेर बंदूकधारी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
आणखी वाचा – “हसनमियाँना आत्ताच धर्म कसा आठवला?” किरीट सोमय्यांचा खोचक प्रश्न
या कारवाईवेळी मुश्रीफ हे मुंबईत होते. घरी त्यांची पत्नी आणि साजिद, अबिद व नवीद ही तिन्ही मुले, सुना, नातवंडे असा परिवार होता. मुश्रीफ यांचे समर्थक माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्या घरावरही सकाळी छापा टाकण्यात आला.पुण्यातील कोंढवा येथील अशोका म्यूज सोसायटी आणि गणेशिखड रस्त्यावरील मालमत्तांवरही कारवाई करण्यात आली. कोंढवा भागात मुश्रीफ यांचे नातेवाईक राहतात. ‘ईडी’च्या पथकाने मुश्रीफ यांच्या नातेवाईकांची चौकशी करून काही कागदपत्रे जप्त केली. मात्र, जप्त केलेल्या कागदपत्रांविषयी अधिक तपशील उपलब्ध होऊ शकला नाही. मुश्रीफ यांचे व्यावसायिक भागीदार चंद्रकांत गायकवाड यांच्या कार्यालयावरही ‘ईडी’च्या पथकाने छापा टाकला. गायकवाड यांची चौकशीही करण्यात आली.
हसन मुश्रीफ यांच्या आर्थिक व्यवहारावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनेक आरोप केले आहेत. याबाबत त्यांनी ‘ईडी’कडे तक्रारी केल्या आहेत. त्यानंतर जुलै २०१९ मध्ये कागल येथे व पुणे येथील मुश्रीफ यांच्या निवासस्थानी प्राप्तिकर विभागाने छापा टाकला होता. सोमय्या यांनी आरोप सुरु ठेवल्याने मुश्रीफ यांनी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. नववर्षांच्या सुरुवातीला सोमय्या यांनी ट्विट करून पुन्हा कारवाई होण्याचे संकेत दिले होते.
आणखी वाचा – बारा तास चौकशीनंतर ईडी पथक परतले; मुश्रीफांच्या घराबाहेर समर्थकांचा मेळावा
‘प्राप्तीकर विभागा’ने दीड-दोन वर्षांपूर्वीही माझ्या घरांवर छापे टाकले होते. त्यावेळी केंद्रीय तपास यंत्रणांनी सर्व माहिती घेतली होती. त्यात काहीही निष्पन्न झाले नव्हते. पुन्हा छापेमारी कशासाठी करण्यात आली, याबाबत मला माहिती नाही. नवाब मलिक, हसन मुश्रीफ आणि अस्लम शेख यांच्यावर कारवाई होणार असल्याची भाषा किरीट सोमय्या यांनी केली. त्यामुळे विशिष्ट धर्मातील लोकांना लक्ष्य केले जात आहे का, हा प्रश्न आहे.
– हसन मुश्रीफ, ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस</strong>