पुणे : बनावट कंपनी स्थापन करून गुंतवणुकीच्या आमिषाने राज्यभरातील गुंतवणूकदारांची शंभर कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) पुण्यातील कात्रज भागात कारवाई केली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
विनोद तुकाराम खुंडे, संतोष तुकाराम खुंटे, मंगेश खुंटे, किरण पितांबर अनारसे, अजिंक्य बडवे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ईडीच्या अधिकाऱ्यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आयपीएस ग्रुप ऑफर कंपनी आणि ग्लोबल ॲफिलेट कंपनी स्थापन केली होती. या कंपनीत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष आरोपींनी गुंतवणूकदारांना दाखविले होते. राज्यभरातील गुंतवणूकदारांनी या कंपनीत पैसे गुंतविले होते. आरोपींनी गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा केले. ही रक्कम कंपनीच्या खात्यात जमा केली नाही. आरोपींनी बनावट नावाने बँकेत खाते काढले होते. या खात्यात गुंतवणूकदारांकडून गोळा केलेली रक्कम जमा करण्यात आली होती.
हेही वाचा – पुणे : लेझर बीमच्या विरोधात ग्राहक पंचायतीची मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका
काहीजणांना मध्यस्थ म्हणून काम करण्यास आरोपींनी सांगितले होते. गुंतवणूकदारांना प्रोत्साहित केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष आरोपींनी दाखविले होते. मुख्य सूत्रधार विनाेद खुंटे याने गुंतवणूकादारांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे उकळले होते. परदेशी मुद्रा विनिमय व्यवहार पाहणारी काना कॅपिटल नावाची कंपनी त्याने स्थापन केली. गुंतवणूकदारांना या कंपनीत गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यानंतर कंपनी बंद करून आरोपी पसार झाले. ईडीच्या पथकाने मंगळवारी कात्रज भागातील आंबेगाव बुद्रुक परिसरातील कंपनीच्या कार्यालयावर छापा टाकला.