आम्ही विचारांबरोबर राहण्याची आणि संघर्ष करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे येत्या काळात आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर भाजपा किंवा यंत्रणांकडून कारवाई केली जाईल. मलाही ईडीची नोटीस येऊ शकते. पण, मी शरद पवारांबरोबर भक्कमपणे उभा आहे, असं आमदार रोहित पवार यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातील एका कार्यक्रमानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रोहित पवार म्हणाले, “आम्ही अजित पवार गटावर बोललं पाहिजे, ही भाजपाची रणनिती आहे. आमच्या-आमच्यात बोलून व्यस्त राहावे आणि भाजपाकडे दुर्लक्ष करावे, हे आम्ही कसं करू शकतो? शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि शिंदे गटात शाब्दिक भांडण पाहिलं आहे. पण, आता उद्धव ठाकरे भाजपाच्या विरोधात बोलत आहेत. कदाचित, उद्धव ठाकरेंना कळलं असेल, की मुळावर घाव घातला पाहिजे.”

हेही वाचा : “कानाखाली मारणाऱ्याला १ लाख बक्षीस”, परशुराम सेवा संघाच्या घोषणेनंतर भुजबळांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

“आपला विचार संपवणाऱ्या भाजपावर बोललं पाहिजे”

“शरद पवार ६० वर्षे राजकारणात असल्याने मुळावरच घाव घालण्यास सुरुवात केली आहे. शरद पवार भाजपाच्या विरोधात बोलतात, तेव्हा संदेश देतात की, तिकडे गेलेले नेते महत्वाचे नाहीत. महत्वाचं भाजपा आहे, जो आपला विचार संपवण्याचा प्रयत्न करतोय. आपला विचार संपवणाऱ्या भाजपावर बोललं पाहिजे,” असं रोहित पवार यांनी म्हटलं.

“…तरी आम्ही शरद पवार आणि महाराष्ट्र धर्माबरोबर राहू”

“आम्ही विचारांबरोबर राहण्याची आणि संघर्ष करण्याची स्पष्ट भूमिका घेतली आहे. त्यामुळे येत्या काळात आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर भाजपा किंवा यंत्रणांकडून कारवाई केली जाईल. कितीही कारवाई केली, तरी आम्ही शरद पवार आणि महाराष्ट्र धर्माबरोबर राहू,” असं रोहित पवारांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा : “केंद्रीय सत्तेने दिल्लीवर ताबा मिळविला, आता मुंबई?” मनसेनं व्यक्त केली शंका

“ईडीची नोटीस येऊ शकते”

ईडीची नोटीस येऊ शकते का? या प्रश्नावर रोहित पवार म्हणाले, “नोटीस आलेली आहे की येणार आहे, यावर मी बोलणार नाही. पण, ईडीची नोटीस येऊ शकते. तरीही, मी महाराष्ट्रातील लोकांच्या बाजूने भूमिका घेत राहणार. मी शरद पवार यांच्याबरोबर भक्कमपणे उभा आहे.”

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ed send notice me said rohit pawar in pune ssa
Show comments