पुणे : खाद्यतेलावर आयात शुल्क लागू करण्यापूर्वी आयात झालेल्या सुमारे ३० लाख टन तेलाची विक्री वाढीव दराने करू नये, अशी सूचना केंद्र सरकारने खाद्यतेल कंपन्यांना केली होती. तरीही कंपन्यांनी दरवाढ केल्यामुळे किरकोळ बाजारात खाद्यतेलांच्या दरात प्रतिलिटर सरासरी २० रुपयांनी वाढ झाली आहे. खाद्यतेल दर नियंत्रित करण्याचे केंद्र सरकारचे प्रयत्न फसले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 केंद्र सरकारने देशात उत्पादित होणाऱ्या तेलबियांना हमीभाव मिळावा. शेतकऱ्यांचा रोष कमी व्हावा म्हणून कच्च्या खाद्यतेलावरील आयात शुल्क ५.५ टक्क्यांवरून २७.५ टक्के आणि शुद्ध खाद्यतेलावरील आयात शुल्क १३.७५ टक्क्यांवरून ३५.७५ टक्के केला आहे. त्याचा तत्काळ परिणाम खाद्यतेल बाजारावर दिसून आला. खाद्यतेल कंपन्यांनी तातडीने दरवाढ केल्यामुळे किरकोळ बाजारात खाद्यतेलाच्या किमती प्रतिलिटर २० रुपयांनी वाढल्या आहेत.

हेही वाचा >>> कंत्राटी शिक्षक नियुक्तीमध्ये महत्त्वाचा बदल… शिक्षण विभागाचा नवा निर्णय काय?

केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाने खाद्यतेलाची संभाव्य दरवाढ रोखण्यासाठी खाद्यतेल कंपन्यांना आयात शुल्क वाढविण्यापूर्वी देशात स्वस्तात आयात झालेल्या सुमारे ३० लाख टन तेलाचा विक्री वाढीव दराने करू नये. हे तेल सुमारे ४० ते ४५ दिवस पुरेल. या काळात दसरा आणि दिवाळी सारखे मोठे सण होऊन जातील. त्यानंतर वाढीव आयात शुल्क आकारून आयात केलेल्या तेलाची वाढीव दराने विक्री करावी, असे सूचना वजा आदेश दिले होते.

प्रत्यक्षात खाद्यतेल कंपन्यांनी तातडीने आपल्या दरात वाढ केली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात खाद्यतेलाच्या दरात प्रतिलिटर २० रुपयांनी वाढ झाली आहे. कंपन्यांनी आपल्या कमाल विक्री मूल्यात वाढ केल्यामुळे किरकोळ विक्रेत्यांनाही विक्री दरात वाढ केली आहे. त्यामुळे ऐन दसरा, दिवाळीत खाद्यतेलाच्या दरवाढीची सामना करावा लागत आहे.

हेही वाचा >>> पिंपरी : औद्योगिक परिसरात कचऱ्याचे ढीग; एमआयडीतीसील उद्योजकांचे आंदोलन

वाढत्या बायोडिझेल उत्पादनाचा परिणाम

पामतेल निर्यात करणाऱ्या मलेशिया, इंडोनेशियाने पामतेलापासून बायोडिझेल निर्मितीला चालना देण्याचे धोरण स्विकारले आहे. ब्राझीलमध्येही सोयाबीन तेलापासून बायोडिझेल उत्पादीत केले जात आहे. कच्च्या खनिज तेलाचे दर आवाक्यात असताना बायोडिझेल उत्पादन करणे आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नाही. तरीही धोरणात्मक निर्णय म्हणून जगभरात खाद्यतेलापासून बायोडिझेल निर्मिती होत आहे. त्यामुळे खाद्यतेलाचा दर तेजीत आहेत. यंदा जगभरात सोयाबीनच्या उत्पादनात मोठी वाढ झालेली आहे. जागतिक बाजारात खाद्यतेलातील स्वस्ताई कायम आहे. पण, शेतकरी हितासाठी सरकारने आयात शुल्क वाढविला आहे. सरकारचे हे धोरण तेलबिया उत्पादनात स्वयंपूर्ण होण्यासाठी गरजेचे आहे, असे मत द सॉल्व्हंट एक्स्ट्रॅटर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे कार्यकारी अध्यक्ष भारत मेहता यांनी व्यक्त केले. 

किरकोळ बाजारातील खाद्यतेलाचे दर (प्रतिलिटर)

सोयाबीन – १२४ (सध्याचे दर ) १०७ ( पूर्वीचे दर)

पामतेल – १२० (सध्याचे दर ) १०५ ( पूर्वीचे दर)

सूर्यफूल तेल – १३८ (सध्याचे दर ) ११८ ( पूर्वीचे दर)

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Edible oil companies ignore central government order over price hike pune print news dbj 20 zws