विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांचीही गुणवत्ता वाढवण्यासाठी विविध योजना प्रस्तावित करणारे शिक्षण मंडळाचे ३०५ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीने महापालिकेच्या मुख्य सभेला गुरुवारी अंतिम मंजुरीसाठी सादर केले. शिक्षकांसाठी अनेकविध नव्या योजनांचा समावेश असलेल्या या अंदाजपत्रकात गुणवत्ता सिद्ध करणाऱ्या शिक्षकांसाठी प्रोत्साहन योजनाही प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.
स्थायी समितीचे अध्यक्ष विशाल तांबे यांनी अंदाजपत्रकातील विविध प्रस्तावित योजनांची माहिती गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. मंडळाने सन २०१४-१५ या वर्षांसाठी तयार केलेले अंदाजपत्रक ३२८ कोटींचे होते. महापालिका आयुक्तांनी त्यात कपात करून ते २७९ कोटींवर आणले, तर स्थायी समितीने त्यात थोडी वाढ करून ते अंतिमत: ३०५ कोटींवर नेले आहे. मुख्य सभेत त्याला या वर्षांअखेर मंजुरी दिली जाईल.
अंदाजपत्रकातील तरतुदींबाबत तांबे यांनी सांगितले, की महापालिका सेवकांप्रमाणेच शिक्षण मंडळातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी घरबांधणी तसेच वाहन खरेदी, संगणक खरेदी, लॅपटॉप खरेदीसाठी कर्ज योजना लागू करण्यात आली असून त्याचे सर्व लाभ महापालिका कर्मचाऱ्यांप्रमाणेच मंडळातील शिक्षक व कर्मचाऱ्यांना मिळतील. बालवाडी शिक्षिकांना सध्या महिन्याला सहा हजार रुपये मानधन दिले जाते. त्यात एक हजारांची तसेच बालवाडी सेविकांच्या साडेचार हजार या मानधनात सातशे रुपयांची वाढ करण्याचाही प्रस्ताव अंदाजपत्रकात आहे. शिक्षिका व सेविकांना दोन महिन्यांची प्रसूतिरजा देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
ज्या शाळेतील पाच विद्यार्थी सलग तीन वर्षे शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत येतील, त्या शाळेच्या मुख्याध्यापकांना तसेच संबंधित शिक्षकांना अतिरिक्त एक वेतनवाढ देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतल्याचेही तांबे यांनी सांगितले. शिक्षण मंडळाच्या ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ विजेत्या शिक्षकांना टॅब देण्याचीही योजना अंदाजपत्रकात प्रस्तावित आहे.
पगार वेळेवर देण्यासाठी तरतूद
शासनाकडून येणारे अनुदान विलंबाने प्राप्त होत असल्यामुळे शिक्षण मंडळाचे पगार वेळेवर होत नाहीत. त्यामुळे कर्ज घेतलेल्या अनेक शिक्षक व कर्मचाऱ्यांना हप्ता वेळेवर भरता येत नाही. त्यामुळे दंडही होतो. त्यावर उपाय म्हणून पाच कोटी रुपये उचल स्वरूपात मंडळाला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि ही रक्कम मंडळाला फक्त पगारासाठीच वापरता येईल, असेही तांबे यांनी सांगितले.
अंदाजपत्रकावर दृष्टिक्षेप

  • – शिक्षण मंडळाचे अंदाजपत्रक ३०५ कोटींचे
  • – मंडळाच्या कारभारातही ई गव्हर्नन्स
  • – मंडळाच्या १५ शाळांना आयएसओ मिळवण्याची योजना
  • – फर्निचर खरेदीसाठी एक कोटी ऐवजी पन्नास लाख
  • – शिक्षकांना घरबांधणी, संगणक, लॅपटॉपसाठी कर्ज                                                                                                                             

Story img Loader