पिंपरी महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना ‘बाटा’ कंपनीचे बूट वाटप करण्याचा करार झाला असताना त्या कंपनीच्या नावाखाली बनावट बुटांचा पुरवठा करण्याचा पुरवठादाराचा उद्योग उघडकीस आला आणि शिक्षण मंडळाचा वर्षांनुवर्षे सुरू असलेला ‘गोलमाल’ चव्हाटय़ावर आला आहे. मुळातच शिक्षण मंडळाचा कारभार ठेकेदारांच्या इशाऱ्यावरच चालतो, हे वेळोवेळी उघड झाले आहे. आता बूटवाटपाच्या निमित्ताने ठेकेदार शिरजोर झाल्याचे आणि मंडळाचे सदस्य व प्रशासन अधिकारी त्यांच्या अर्थकारणापुढे लाचार असल्याचे पुन्हा दिसून आले आहे.
पालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या आदेशानुसार या प्रकरणी राजेश नहार या पुरवठादाराच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सर्व सदस्य बूट बनावट असल्याची तक्रार करत असताना सभापती विजय लोखंडे यांनी मात्र हे बूट चांगले असल्याचे ‘अर्थपूर्ण’ प्रमाणपत्र दिल्याने सर्वाच्याच भुवया उंचावल्या आहेत. हे प्रकरण म्हणजे ‘हिमनगाचे टोक’ आहे, असे अनेक ‘उद्योग’ मंडळाने वर्षांनुवर्षे बिनबोभाट केले आहेत. मात्र, सदस्य, अधिकारी व ठेकेदारांमध्ये संगनमत असल्याने त्याची वाच्यता होत नव्हती. आता थेट गुन्हा दाखल झाला आहे.
पहिली ते सातवीच्या ५० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना ९० लाखांचे बूटवाटपाचे काम नहार यांच्या ‘रिअल एन्टरप्रायजेस’ या कंपनीला देण्यात आले होते. प्रशासन अधिकारी आशा उबाळे यांना पाहणीत बनावट बूट आढळून आल्यानंतर तसा अहवाल त्यांनी अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांना दिला. सदस्यांनी ‘शो रूम’मध्ये पडताळणी केल्यानंतर त्यांनाही तेच दिसून आल्याने ‘बुटांचे वाटप करू नये,’ असे पत्र त्यांनी दिले. सभापती लोखंडे यांनी मात्र हे बूट स्वीकारण्यास हरकत नसून त्वरित वाटप सुरू करण्याविषयीचे पत्र दिले. पुरवठादाराने चपळाई करत वाटप सुरू केल्याची बाब सदस्यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली असता वाटप थांबवण्याचे आदेश त्यांनी दिले. तरीही आठ दिवस पुरवठादाराच्या सोयीसाठी चालढकल सुरू होती. अखेर, आयुक्तांनी नहार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे तसेच पिंपरीगावातील जुन्या ड प्रभागात कार्यालयातील त्याचे गोदाम सील करण्याचे आदेश दिले. गुरुवारी दिवसभर या संदर्भातील नाटय़मय घडामोडी सुरू होत्या.

Story img Loader