पुणे : शैक्षणिक वर्ष १ एप्रिलपासून सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे शिक्षण राज्यमंत्र्यांनी दोनच दिवसांपूर्वी सांगितलेले असताना, शिक्षण आयुक्तांनी मात्र येत्या शैक्षणिक वर्षात प्रचलित पद्धतीनुसार शाळा जूनमध्येच सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.‘आगामी शैक्षणिक वर्ष १ एप्रिलपासून सुरू करण्याचा प्रयत्न असून, याबाबत अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवून काम सुरू केले आहे,’ असे शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी नुकतेच पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. त्यामुळे राज्यभरातील शाळा, पालक, संस्थाचालक, शिक्षक अशा सर्वच घटकांमध्ये याबाबत चर्चा सुरू झाली. अर्थात, त्याचे पुरेसे स्पष्टीकरण न मिळाल्याने या संदर्भात संभ्रमाचेच वातावरण होते. या पार्श्वभूमीवर, ‘येत्या शैक्षणिक वर्षात प्रचलित वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात येणार नाही. त्यामुळे शाळा जूनपासूनच सुरू होतील. शाळा सुरू करण्याच्या वेळापत्रकात बदल करायचा झाल्यास त्याबाबत सविस्तर चर्चा करणे, तसेच योग्य वेळ देणेही आवश्यक आहे. त्यामुळे सद्यस्थितीत शाळा सुरू करण्याबाबत कोणताही बदल होणार नाही,’ असे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची शालेय स्तरावर अंमलबजावणी करण्यासाठी राज्य अभ्यासक्रम आराखडा विकसित करण्यात आला आहे. त्यात नव्या पाठ्यपुस्तकांची निर्मिती करण्याबरोबरच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे (सीबीएसई) शैक्षणिक वेळापत्रक राज्यातील शाळांनाही लागू करण्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील शाळाही १ एप्रिलपासून सुरू करण्याचा मुद्दा चर्चेत आहे. मात्र, राज्यातील प्रत्येक भागातील स्थिती वेगळी असल्याने प्रचलित वेळापत्रक बदलून १ एप्रिलपासून शाळा सुरू करण्यास विरोध आहे. अद्याप याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही, तसेच शिक्षण विभागानेही शासन निर्णय प्रसिद्ध केलेला नाही.

दरम्यान, ‘पहिलीसाठी ‘सीबीएसई’च्या धर्तीवर राज्य अभ्यासक्रम आराखड्यानुसार पाठ्यपुस्तके तयार करण्यात आली आहेत. ही नवी पाठ्यपुस्तके येत्या शैक्षणिक वर्षापासून लागू करण्यात येणार आहेत,’ असे सिंग यांनी स्पष्ट केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Education commissioner clarified that schools will start in june despite earlier statements for april pune print news ccp 14 sud 02