पुणे : शिक्षक भरतीसाठी पवित्र संकेतस्थळावर जाहिराती दिलेल्या शिक्षण संस्थांतील शाळांमध्ये २०२४-२५नुसार मंजूर पदांची पडताळणी करून जाहिरातींची कार्यवाही करण्याचे निर्देश शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण संचालकांना दिले आहेत. शिक्षक अतिरिक्त असताना आणि विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे शिक्षकांची पदे कमी झाली असल्यास संबंधित संस्थांच्या जाहिराती, प्रत्यक्ष रिक्त पदांची खातरजमा करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.

शिक्षक भरतीच्या पहिल्या टप्यात मुलाखतीशिवाय १५ हजार ६३, मुलाखतीसह २ हजार ७७१ अशा एकूण १८ हजार ३४ पदांसाठी उमेदवारांची शिफरस करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात पवित्र संकेतस्थळाद्वारे नव्याने जाहिरातींची कार्यवाही करण्यात येत आहे. २०२४-२५च्या संच मान्यतांची कार्यवाही झाली आहे. मात्र, २०२४-२५ च्या संच मान्यतेमध्ये पदे कमी-अधिक होण्याची शक्यता विचारात घेता काही व्यवस्थापनांकडे पदे कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रिक्त पदे आणि जाहीराती यांची खातरजमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिलेल्या सूचनांनुसार शिक्षक भरतीसाठी जाहिराती प्रसिद्ध केलेल्या संस्थांच्या संच मान्यता २०२४-२५ प्रमाणे मान्य असणे, कार्यरत आणि रिक्त पदांचा तपशील विचारात घ्यावा. पद रिक्त नसताना जाहिरात प्रकाशित होणार नाही याची दक्षता घ्यावी. पद मंजूर नसताना पदभरतीची कार्यवाही झाल्यास उमेदवारांना शाळेत रूजू करून घेता येत नाही. त्यामुळे शाळांमधील पदभरतीसाठी संकेतस्थळावर जाहिराती दिलेल्या व्यवस्थापनांच्या शाळांतील २०२४-२५नुसार मंजूर पदे पडताळून पदभरतीसाठी जाहिरातीची कार्यवाही करावी. संकेतस्थळावर जाहिराती अंतिम करण्याची कार्यवाही १५ एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.