पुणे : शिक्षक भरती प्रक्रिया पूर्णपणे संगणकीकृत असल्याने त्यात हस्तक्षेपाला वाव नाही. त्यामुळे अभियोग्यताधारकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा खोडसाळपणा करणाऱ्यांवर पोलिसांमार्फत स्वतंत्रपणे देखरेख करण्यात येत आहे , अशी माहिती शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यात २१ हजार पदांसाठीची शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे माहिती दिली. शिक्षक भरती आता महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचली आहे. पात्र अभियोग्यताधारकांच्या संस्था, जिल्हा परिषदेमधील नियुक्तीच्या याद्या तयार करण्याचे संगणकीय कामकाज सध्या सुरू आहे. ही पूर्णपणे पारदर्शक, संगणकावर आधारित प्रक्रिया आहे. त्यामध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप होणार नाही याची दक्षता घेण्यात आलेली आहे. असे असतानाही अभियोग्यताधारकांमधील काही स्वयंघोषित खोडसाळ व्यक्ती, तसेच काही अनधिकृत व्यक्ती या प्रक्रियेबाबत संभ्रम निर्माण करून फसवणूक करण्याची शक्यता काही अभियोग्यताधारकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे खोडसाळपणा करणाऱ्या व्यक्ती, तसेच त्यांच्या संपर्कातील व्यक्तींवर पोलीस विभागामार्फत स्वतंत्रपणे देखरेख करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा…Shiv Jayanti 2024 ‘शिवरायांच्या रणनीतीला मानवतेचा सुगंध,’ मुख्यमंत्र्यांचे शिवनेरी येथील सोहळ्यात उद्गार

जिल्हा परिषदेत, संस्थेत भरती करून देण्याची खोटी आश्वासने देऊन गेल्या भरतीच्या वेळी काही दलालांनी उमेदवारांची फसवणूक केली असल्याची बाब काही अभियोग्यताधारकांनी निदर्शनास आणली आहे. संगणकाद्वारे होणाऱ्या प्रक्रियेचे श्रेय घेऊन काही मंडळी अभियोग्यताधारकांची फसवणूक करू शकतात. या प्रकारांना पायबंद घालण्याचा कसोशीने प्रयत्न करण्यात येत आहे. असे कृत्य करून फसवणूक केली जात असल्यास संबंधित पोलिस ठाण्यात तातडीने फिर्याद दाखल करावी, फिर्याद दाखल करणाऱ्या तक्रारदारास प्रशासनाकडून सहकार्य करण्यात येईल, अशी माहिती मांढरे यांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Education commissioner said police monitoring those creating confusion in computerized teacher recruitment pune print news ccp 14 psg