पुणे-पिंपरी चिंचवड, मुंबई महानगर, नाशिक, नागपूर, अमरावती महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार २५मेपासून ऑनलाइन नोंदणी, प्रवेश अर्जाचा भाग एक भरता येणार असून, दहावीच्या निकालानंतर दहा ते पंधरा दिवसांनी प्रवेशाची पहिली फेरी होणार आहे. तर ऑगस्टअखेरपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> ‘मॉडेलिंग क्षेत्रात या…हजारो रुपये कमवा’, असे सांगून पुण्यातील तरुणांची ‘अशी’ झाली फसवणूक

माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांनी ही माहिती दिली. सीबीएसई, आयसीएसईच्या दहावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. तर राज्य मंडळाकडून दहावीचा निकाल लवकरच अपेक्षित आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्ष २०२३-२४साठी अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन  प्रवेश प्रक्रियेची पूर्व तयारी करणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थी आणि पालकांना माहिती, मार्गदर्शन मिळण्यासाठीचे नियोजन आणि कृती आराखडा तयार करण्यासह विद्यार्थी-पालकांसाठी उद्बोधन वर्ग, शाळा मार्गदर्शन केंद्रासाठी प्रशिक्षण आयोजित करण्याबाबतच्या सूचना विभागीय शिक्षण उपसंचालकांना देण्यात आल्या आहेत.

केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसाठीच्या वेळापत्रकानुसार, २० ते २४ मे या दरम्यान विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज नोंदणी, प्रवेश अर्ज भरण्यासाठी सरावाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. २५ मेपासून ऑनलाइन नोंदणी, प्रवेश अर्जाचा भाग एक भरणे, अर्ज प्रमाणित केला जाईल. २० मेपासून शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी दहावीचा निकाल जाहीर होईपर्यंत सुरू राहील. अल्पसंख्यांक, व्यवस्थापन, संस्थांतर्गत या राखीव जागांअंतर्गत प्रवेश प्रक्रिया दहावीच्या निकालानंतर सुरू करण्यात येईल. त्याबाबत स्वतंत्रपणे सूचना दिल्या जातील. ऑगस्टअखेरपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. पहिल्या विशेष फेरीनंतर अकरावीचे वर्ग सुरू होतील, असे नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा >>> पुणे: ढोले पाटील रस्त्यावर अतिक्रमण विभागाच्या पथकावर हल्ला प्रकरणी पाच जण अटकेत

प्रवेश फेऱ्यांचे स्वरूप ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत तीन नियमित फेऱ्या आणि दोन विशेष फेऱ्या होतील. उर्वरित विद्यार्थ्यांसाठी दैनंदिन गुणवत्ता विशेष फेऱ्या होतील. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरी होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Education department class 11th online admission process schedule released pune print news ccp 14 zws