७३ हजार ८८५ जागा उपलब्ध
पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये या वर्षी अकरावीसाठी ७३ हजार ८८५ जागा उपलब्ध असून प्रवेश प्रक्रियेसाठी विभागवार मदत केंद्र शिक्षण विभागाने सुरू केली आहेत. राज्य मंडळाव्यतिरिक्त इतर मंडळातील विद्यार्थ्यांना या मदत केंद्रावर माहिती पुस्तके मिळणार आहेत.
शहरातील अकरावीचे प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया १६ मे पासून सुरू होत आहे. या वर्षी ५३१ महाविद्यालयांमधील ७३ हजार ८८५ जागा अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसाठी उपलब्ध आहेत. अकरावीच्या माहिती पुस्तकांचे वितरण सुरू झाले असून या वर्षी १ लाख १० हजार माहिती पुस्तके शिक्षण विभागाने छापली आहेत. विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. विभागवार मार्गदर्शन केंद्रांमध्ये विद्यार्थ्यांना काही अडचणी असल्यास, तक्रारी असल्यास त्या मांडता येतील. त्याचप्रमाणे राज्य मंडळाव्यतिरिक्त इतर मंडळांच्या म्हणजेच सीबीएसई, आयसीएसई, आयबी, आयजीसीएसई, एनआयओएस या मंडळाच्या विद्यार्थ्यांना विभागीय केंद्रांवर माहिती पुस्तक घेता येणार आहे.
अर्ज कसा भरावा, कोणती काळजी घ्यावी, महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम कसे द्यावेत याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षण विभागाकडून पालक आणि विद्यार्थ्यांसाठी विभागवार कार्यशाळाही घेण्यात येणार आहेत. याबाबत केंद्रीय प्रवेश समितीच्या सचिव मीनाक्षी राऊत यांनी सांगितले, ‘शुक्रवार आणि शनिवार कार्यशाळा होणार आहेत. सध्या मुख्याध्यापकांचे प्रशिक्षण सुरू आहे, ते झाल्यानंतर पालकांसाठीच्या कार्यशाळेचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर आठवडय़ाच्या अखेरीस कार्यशाळा असल्यास पालकांनाही सोयीचे होते. त्याचे वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा