पुणे : राज्यातील इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय मार्गदर्शन सप्ताह साजरा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने १४ ते २१ जानेवारी या कालावधीत उद्योग-व्यवसाय क्षेत्र भेट, माजी विद्यार्थी मार्गदर्शन सत्र, करिअर मार्गदर्शन असे उपक्रम राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे (एससीईआरटी) संचालक राहुल रेखावार यांनी याबाबतच्या सूचना जिल्हा परिषदांचे माध्यमिक शिक्षणाधिकारी, महापालिकांचे प्रशासन अधिकारी यांना परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत. नववी ते बारावीचे वर्ग असलेल्या सर्व माध्यमांच्या आणि व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये १४ जानेवारी हा दिवस व्यवसाय मार्गदर्शन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यंदा हा उपक्रम सप्ताहाच्या माध्यमातून साजरा करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार उपक्रम राबवण्याचे वेळापत्रकही निश्चित करण्यात आले आहे.
हेही वाचा >>> सहायक प्राध्यापक होणे नेट-सेटशिवायही शक्य?
विविध करिअर क्षेत्रांतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन १४ जानेवारी रोजी, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचे सत्र १५ जानेवारी रोजी, व्यवसायाचा मंत्र या विषयावर यशस्वी व्यावसायिकांचे मार्गदर्शन १६ जानेवारी रोजी, एससीईआरटीच्या वेबिनार मालिकेचे प्रसारण १७ जानेवारी रोजी, शाळेनजीकचे उद्योग, कारखाने येथे भेट आयोजित करून भेटीसंदर्भातील अहवाल लेखन १८ जानेवारी रोजी, नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी विद्यार्थ्यांची आवड, त्यांची क्षमता आणि उपलब्ध करिअर याबाबत मार्गदर्शन १९ जानेवारी रोजी, दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर मानसशास्त्र तज्ज्ञांचे परीक्षा आणि ताणतणाव निवारण विषयावर मार्गदर्शन २१ जानेवारी रोजी आयोजित करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा >>> ‘रेडझोन’ला ‘लाल दिवा?’ सीमेबाबत संभ्रमावस्था कायम; अंतिम नकाशाची प्रतीक्षा
अधिकाऱ्यांच्या शाळा भेटी सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनांच्या नववी ते बारावीच्या शाळांमध्ये समुपदेशन केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या सप्ताहाचे आयोजन केंद्रामार्फत राबवावे. या सप्ताहाच्या काळात संबंधित अधिकाऱ्यांनी शाळा भेट देऊन अहवाल सादर करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.