पुणे : अजित पवार, जयंत पाटील, नाना पटोले पहिल्या दिवसापासूनच सरकार पडेल असे म्हणतात. परंतु तसे काहीही झाले नाही. सरकारला शंभर दिवसांपेक्षा अधिक काळ झाला आहे. सरकार अतिशय उत्तम चाललेले आहे. रोज लोकोपयोगी निर्णय होत आहेत. त्यामुळे कुणीही नाराज नाही. नाराजांची समजूत काढण्याची व्यवस्था आमच्या सरकारकडे असल्याचा टोला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

हेही वाचा >>> पुणे : शासनाच्या शाळाबंदीच्या हालचालींविरोधात चळवळ; राज्यभरातील ६५ संघटना एकवटल्या

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वाचन प्रेरणा दिन आणि मुक्त संवाद कार्यक्रमानंतर पत्रकारांशी पाटील यांनी संवाद साधला. त्या वेळी विविध विषयांवर पाटील यांनी भाष्य केले. ‘सेक्सटॉर्शन’च्या जवळपास १ हजार ४०० तक्रारी दाखल झाल्याबाबत पाटील म्हणाले, की येत्या आठवड्यात पालकमंत्री म्हणून सर्वच विषयांचा आढावा घेणार आहे. पोलिस मुख्यालयाचा आढावा घेताना हा विषय उपस्थित करणार आहे. त्यामध्ये काही उपाययोजना करण्यात येणार आहेत. यामध्ये तक्रार नोंदविण्यापासून ते प्रबोधन, तसेच धाडस वाढवण्यासाठीचे प्रयत्न असतील. अनेक वेळा तक्रारच नोंदविण्यात येत नाही. त्यामुळे प्रसंग आत्महत्या करण्यापर्यंत जातो. त्यामुळे मीही चिंतेत आहे.

हेही वाचा >>> वीज कापण्याची भीती दाखवून ज्येष्ठ नागरिकाची ५० हजारांची फसवणूक – ज्येष्ठ नागरिकांच्या फसवणुकीचे सत्र कायम

शासकीय नोकरभरतीबाबत पाटील यांनी सांगितले, की २० हजार पोलिसांची भरती करण्यात येणार आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर रखडलेल्या २ हजारांहून अधिक जणांना नियुक्ती देण्यात आली आहे. अजूनही एक हजार जणांना नियुक्ती देण्यात येणार आहे. सध्या २ हजार ७२ प्राध्यापकांच्या जागा भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ७५ हजार पदांची भरती करण्याचा सरकारचा संकल्प आहे. त्यानुसार सर्वच विभागांनी रिक्त पदांचा तपशील जाहीर करण्यास सुरुवात केली आहे.

बेकायदेशीर निर्णयांमुळे स्थगिती द्यावीच लागणार

विकासकामांना सरकार स्थगिती देत असल्याच्या टीकेबाबत पाटील म्हणाले,की महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात आल्यानंतर काही हजार निर्णय बेकायदा घेण्यात आले. त्यामुळे काही कामांना स्थगिती देण्यात येणारच आहे. परंतु योग्य कामे तशीच सुरू राहतील. विद्यापीठाने शुल्कवाढीसंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन विद्यार्थी संघटनांना दिले आहे. तसा निर्णय विद्यापीठाकडून लवकरच घेतला जाणार असल्याचे देखील पाटील यांनी स्पष्ट केले.

Story img Loader