शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या शाळांबाबत तक्रार करण्यासाठी टोल फ्री क्रमांक सुरू करण्याची घोषणा पहिल्याच दिवशी शिक्षण आयुक्तांनी केली आहे. राज्याचे नवे शिक्षण आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी बुधवार पदाचा कार्यभार स्वीकारला.
गेल्या दोन महिन्यांपासून अधिकाऱ्यांना नकोसा म्हणून चर्चेत असलेल्या शिक्षण विभागाला अखेर बुधवारी पूर्ण वेळ आयुक्त मिळाले आहेत. आयुक्तांनीही पहिल्याच दिवशी पालकांना सुखद धक्का देत एन्ट्री केली आहे. शाळांबाबत तक्रारी करण्यासाठी टोल फ्री संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिला जाईल. त्याचप्रमाणे शिक्षण आयुक्त कार्यालयातही पालकांना तक्रार करता येणार आहे, असे भापकर यांनी सांगितले. पदभार स्वीकारल्यानंतर भापकर यांनी माध्यमांशी संवाद साधला.
या वेळी भापकर म्हणाले, ‘शिक्षण विभागाबाबत पालक आणि संस्थांमध्ये विश्वास वाढवण्यासाठी प्रयत्न करणार. त्याचप्रमाणे सर्व शिक्षण संचालनालयांमध्ये समन्वय राखणे आणि गुणवत्तावाढीसाठी काम करणे ही माझी जबाबदारी आहे. शिक्षण विभागाचा आवाका पाहता सर्व गोष्टी समजावून घेणे आवश्यक आहे.’
शिक्षण विभागात काम करण्यासाठी अधिकारी उत्सुक नसतात. याबाबत विचारले असता ते म्हणाले, ‘शिक्षण विभागाशी माझा जवळून संबंध आहे आणि मी शासनाचे आदेश पाळणारा अधिकारी आहे. त्यामुळे जी जबाबदारी दिली जाईल, ती मी पार पाडतो.’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा