लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : कर्वेनगर येथील शाळेत मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नृत्यशिक्षकाच्या गैरकृत्याकडे दुर्लक्ष केल्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या शिक्षण संस्थाचालकाला विशेष न्यायालयाने शुक्रवारी न्यायालयीन कोठडी सुनावली. आरोपी संस्थाचालकाला न्यायालयीन कोठडी झाल्याने त्याचा मुक्काम येरवडा कारागृहात असणार आहे. दरम्यान, आरोपीच्या वकिलांनी जामीन मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज केला आहे.

कर्वेनगरमधील नामांकित शाळेत नृत्यशिक्षकाने मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पालकांच्या शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेत संस्थाचालकाच्या विरोधातही तक्रार केली. मागील दोन वर्षांपासून नृत्यशिक्षक बालकांवर लैंगिक अत्याचार करत असताना, संस्थाचालकांनी त्यांची जबाबदारी पार पाडली नाही. त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी पालकांनी केली. त्यानंतर पोलिसांनी संस्थाचालकाला गुरुवारी अटक करून शुक्रवारी न्यायालयात हजर केले. या वेळी न्यायालयात पालकांची मोठी गर्दी होती.

आणखी वाचा- पिंपरी : बिल्डरांना ‘या’ वेळेत बांधकाम करता येणार नाही; महापालिकेकडून नियमावली जारी

आरोपी संस्थाचालकाने नृत्यशिक्षकाला वैयक्तिक पातळीवर नृत्याचे अतिरिक्त वर्ग घेण्यासाठी कोणत्या अधिकाराखाली परवानगी दिली, तसेच नृत्यशिक्षकाची गैरकृत्ये लपविण्याचा अथवा दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला का, दोन वर्षांपासून हा प्रकार सुरू असताना ही गंभीर घटना उघडकीस आली नसून, संस्थाचालकांनी त्यांची जबाबदारी पार पाडल्याचे दिसत नाही. त्यामुळे संस्थाचालकाचाही या गुन्ह्यात सहभाग आहे का?, शाळेच्या आचारसंहितेत शिक्षकांनी मोबाइल वापरायचा नाही, कोणत्याही मुलाला शारीरिक स्पर्श करायचा नाही, असे नियम असताना आरोपी नृत्यशिक्षक मोबाइल वापरत होता. तसेच बालकांना चुकीचा स्पर्श करत असल्याचे कॅमेऱ्यात दिसत असतानाही संस्थाचालकाने त्याच्यावर कारवाई का केली नाही?, पीडित बालकांचे समुपदेशन सुरू असताना संस्थाचालकाने त्यांच्यावर दबाव टाकला का?, यासंदर्भात तपास करायचा आहे. त्यासाठी संस्थाचालकाला पोलीस कोठडी देण्याची मागणी विशेष सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी दिली.

आणखी वाचा-दोन्ही बंडात साथ देणारा आमदार मंत्रिपद न मिळाल्याने अजितदादांवर नाराज; अधिवेशन सोडून परतले मतदारसंघात

आरोपी संस्थाचालकाच्या वतीने अड. रोहित तुळपुळे यांनी बाजू मांडली. बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायद्याचे कलम ७५ हे या प्रकरणात आरोपी संस्थाचालकावर लागू होत नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला. तो ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपी संस्थाचालकाला न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, बचाव पक्षातर्फे जामीनासाठी अर्ज केला असून, त्यावर सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे, असे तुळपुळे यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Educational institution director remanded in police custody for negligence in sexual assault case pune print news vvk 10 mrj